Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून विविध स्तरातील लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मोदी सरकारचा हा अंतरीम अर्थसंकल्प असणार आहे. कारण यानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापुढचा पूर्ण अर्थसंकल्प हा नवीन सरकार मांडणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत देशात एकूण 91 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मोदी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणारे मंत्री कोणते?
1 फेब्रुवारी 2024 ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. स्वातंत्र्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाचे आर्थिक चित्र मांडले आहे. 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकूण 11 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारचा हा 12वा अर्थसंकल्प असणार आहे. त्यापैकी 10 सर्वसाधारण आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प असून त्यात 2024 च्या अर्थसंकल्पाचा समावेश आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 2014 ते 2018 दरम्यान तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 अर्थसंकल्प सादर केले. 2019 चा अंतरिम अर्थसंकल्प पियुष गोयल यांनी सादर केला. तर विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 ते 2023 या कालावधीत 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. तो अंतरिम अर्थसंकल्प असेल.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती अर्थसंकल्प सादर?
भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशात एकूण 91 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण अर्थसंकल्पांची संख्या 77 असून, 14 अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प (अंतरिम अर्थसंकल्प 2024) हा देशाचा 92 वा अर्थसंकल्प असेल. विशेष बाब म्हणजे 17व्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून संसदेचे हे विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत चालणार आहे.
पुढच्या दोन आठवड्यानंतर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. बजेटमध्ये विविध घोषणा केल्या जाऊ शकतात. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी सलग सहावा अर्थसंकल्प सादर करतील, तेव्हा महागाई नियंत्रणात ठेवताना उपभोग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे. उपभोग वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांच्या हातात अधिक पैसे मिळवणे. स्टँडर्ड डिडक्शनची व्याप्ती वाढवून किंवा टॅक्स स्लॅब बदलून कर ओझे कमी करण्याचा दुसरा मार्ग असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या: