मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उलथापालथ दिसून येत आहे. बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे समभाग (HDFC Bank Shares) चांगलीच उसळी मारत आहेत. या बँकेचे शेअर्स आगामी काही दिवसांत चांगला परतावा देऊ शकतात, असा दावा गुंतवणूक सल्लागारांकडून केला जातोय. आणखी काही दिवस या बँकेचे शेअर्स होल्ड केल्यास ते 2000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असं या तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, सध्या या बँकेच्या एका शेअरचे मूल्य हे 1536.35 रुपये आहे.


..तर होऊ शकतो 30 टक्के नफा


एचडीएफसी बँकेच्या शेअरचे मूल्य आगामी काळात वाढू शकते, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरने या बँकेचे शेअर्श खरेदी करताना टार्गेट प्राईझ दोन हजार रुपये ठेवायला हवे, असे सांगत शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच ही कंपनी तुम्हाला अवघ्या काही दिवसांत तब्बल 30 टक्के नफा देऊ शकते. 


शेअर महिन्याभरात 7.50 टक्क्यांनी वाढला 


याआधी मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्व्हिसेस या कंपनीनेदेखील एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. या बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास टार्गेट 1950 रुपये ठेवावे, असे ओस्वालने म्हटले आहे. सध्या या बँकेत गुंतवणूक करा, असे सांगितले जात असले तरी याआधीच्या माहिन्यात बँकेचे शेअर्स गडगडले होते. हा शेअर वर्षभरात 1757.50 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या शेअरने काही काळ मोठी उंची गाठली असली तरी तो 1365.55 रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र सध्या हा शेअर चांगला चर्चेत असून गेल्या महिन्याभरात तो 7.50 टक्क्यांनी वाढला आहे. याच कारणामुळे तो खरेदी करण्यावर भर द्यावा, असे सांगितले जात आहे.


शेअर्स होल्ड करावे की विकावे? 


मनी कंट्रोल या संकेतस्थळानुसार एकूण 39 शेअर मार्केट अॅनालिस्टपैकी साधारण 74 टक्के अॅनालिस्ट हा शेअर खरेदी करावा, असं सांगतायत. तर 15 टक्के अॅनालिस्ट्सना हा शेअर अपेक्षेपेक्षा चांगले रिटर्न्स देईल असे वाटते. एकाही अॅनालिस्टने एचडीएफसीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिलेला नाही.


एचडीएफसीचा शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे? 


एचडीएफसीच्या प्रमोटर्सने बँकेतील शेअर होल्डिंगमधील हिस्सेदारी कमी केली आहे. सध्या प्रमोटर्सकडे 25.52 टक्के शेअर्स आहेत. यावेळच्या तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही आपली गुंतवणूक 52.30 टक्क्यांहून 47.83 टक्के केली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत मात्र वाढ झालेली आहे. ही वाढ 30.45 वरून 33.32 टक्के झाली आहे. अन्य गुंतवणूकदारांकडे एचडीएफसीचे 18.84 शेअर्स आहेत. 



(टीप- माहिती देणे, हाच वरील लेखाचा उद्देश आहे. आम्ही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)


हेही वाचा >


रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील मोठ्या बँकेवर बंदी; ग्राहकांना पैसे काढण्यासही निर्बंध