RBI Ban Bank From Maharashtra : नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) महाराष्ट्रातील सहकारी बँकेतून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे या बँकेशी संबंधित ग्राहक पुढच्या सहा महिन्यांपर्यंत पैसे काढू शकणार नाहीत. याशिवाय बँकेला कोणत्याही ग्राहकाला कर्ज किंवा इतर रक्कम देण्यास परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या या पावलामुळे सहकारी बँकांचे हजारो ठेवीदार बँकेतून ठेवी काढू शकत नसल्यानं चिंतेत आहेत. बँकेचे ठेवीदार आणि ग्राहक मोठ्या कोंडीत सापडले आहेत. 


भारतीय रिझर्व्ह बँकेनं शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर बंदी घातली आहे. इकोनॉमिक्स टाईम्सनं यासंदर्बात वृत्त दिलं आहे. ईटीच्या वृत्तानुसार, आरबीआयनं शिरपूर बँकेबाबत अशा सूचना जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, आरबीआयनं पीएमसी बँक आणि येस बँकेत पैसे काढण्यावर समान निर्बंध लादले होते. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरबीआयनं हे निर्बंध लादले आहेत.


बँक अपयशी ठरल्यास ग्राहकांनी काय करावं?


मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, बँक रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय कोणतंही कर्ज, आगाऊ अनुदान किंवा नूतनीकरण करणार नाही. तसेच कोणीही गुंतवणूक करणार नाही. त्यामुळे आता ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. जेव्हा एखादी बँक अपयशी ठरते किंवा ती बंद केली जाते. तेव्हा ग्राहकांना कोणते अधिकार असतात? ज्या शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं बंदी घातली आहे, त्या बँकेच्या ग्राहकांनी आता काय करावं? त्यांच्यासमोर कोणते पर्याय असतील? जाणून घेऊयात सविस्तर


ग्राहकांना कोणते अधिकार आहेत?


एखादी बँक डबघाईला आल्यास आणि आरबीआयनं त्या बँकेवर बंदी घातल्यास, ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यानुसार, बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराला 5 लाखा रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण असतं, ज्यामध्ये त्या विशिष्ट बँकेतील त्यांच्या खात्यातील मुद्दल आणि व्याज समाविष्ट असतं. विमा संरक्षणाची रक्कम खात्यावर विचार न करता एकत्र घेतलेल्या सर्व ठेवींना लागू होते.        


पैसे कधी परत मिळणार?


ठेव विमा अंतर्गत, 90 दिवसांच्या आत ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जारी केली जाते. आरबीआयच्या नियमानुसार, शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे ग्राहक अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.