GST Council Meeting : सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. ही बैठक याआधी जानेवारी महिन्यात होणार होती. मात्र, डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मागील बैठकीत एक हजार रुपयांच्या किमतीखालील रेडिमेड कपडे आणि शूजवर कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात उद्योजकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. 


मागील जीएसटी परिषदेच्या बैठकीत कपडे आणि शूजवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. विरोधकांनीदेखील यावर टीका केली होती. पश्चिम बंगालचे माजी अर्थमंत्री अमित मित्रा यांनी कपडे आणि शूजवरील कर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. तर, तेलंगणाचे उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी देखील या निर्णयावर सरकारने पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. 


एक हजारहून कमी किंमतीच्या कपड्यांवरील आणि शूजवरील कर वाढवण्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता. गुरुवारी, 30 डिसेंबर रोजी दिल्ली आणि सूरतसह देशभरातील अनेक शहरांमध्ये कापड व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. सरकार आज वाढलेले कर मागे घेईल अशी अपेक्षा दिल्ली व्यापारी संघाचे देवराज बाजवा यांनी सांगितले. 


जीएसटी स्लॅबची संख्या कमी होणार?


जीएसटी स्लॅबची संख्या चारवरून तीन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्लॅब कमी केल्यामुळे जीएसटी कर प्रणाली अधिक सोपी होईल अशी उद्योजकांना अपेक्षा आहे. जीएसटी महसूल वाढवण्यासाठी कर दरात वाढ होऊ शकते. मात्र, आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय आताच घेतला जाणार नाही. कर प्रणाली अधिक सुटसुटीत, सरळ सोपी करण्यासाठी जीएसटी लागू करण्यात आला. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला असल्याचे आक्षेप उद्योजक, व्यापाऱ्यांनी घेतला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: