नवी दिल्ली हिंदू धर्मीयांमध्ये गंगाजल हे  अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मागील काही दिवसांमध्ये गंगाजलवर जीएसटी (Gangajal GST) लागू केल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे गंगाजलवर (Gangajal) कर लावल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स म्हणजेच CBIC ने गंगाजलवर  जीएसटी लावण्याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. सीबीआयसीने गंगा पाण्यावर जीएसटी लावण्याच्या वृत्त फेटाळून लावले आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून गंगाजल जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले असल्याचे CBIC ने स्पष्ट केले आहे. 


CBIC ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की गंगाजलवर GST लागू केल्याचे वृत्त समोर आले आहे. गंगाजल देशभरातील लोक पूजेसाठी वापरतात. पूजेचे साहित्य जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. 18-19 मे 2017 आणि 3 जून 2017 रोजी झालेल्या 14व्या आणि 15व्या GST कौन्सिलच्या बैठकीत पूजा साहित्यावर GST लावण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत पूजा साहित्य जीएसटीमुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसटी लागू झाल्यापासून गंगेचे पाणी जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.






हिंदू धर्मीयांसाठी असलेल्या पवित्र गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येताच त्यावरून राजकारण सुरू झाले. गंगोत्री येथून गंगा उगम पावणाऱ्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गंगा पाण्यावर जीएसटी लावण्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, 'मोक्षदायिनी गंगा सर्वसामान्य भारतीयांसाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आज उत्तराखंडमध्ये आहात हे चांगले आहे, पण तुमच्या सरकारने पवित्र गंगाजलावरच 18 टक्के जीएसटी लावला आहे.






गंगेच्या पाण्यावर जीएसटी लावण्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सरकारवर राजकीय हल्ले तीव्र झाले आहेत. ज्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या CBIC ने एक स्पष्टीकरण जारी केले आहे ज्यामध्ये गंगा पाण्यावर जीएसटी लावण्याचे वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे.