Rice procured : केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी (Rice Procured) सुरु आहे. आत्तापर्यंत खरीप हंगामातील 600 लाख टनांहून अधिक तांदळाची खरेदी केली आहे. याचा 75 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सरकारनं तांदूळ खरेदीच्या बदल्यात शेतकऱ्यांना आधारभूत किंमत म्हणून 1,30,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये  तांदूळ खरेदी  सुरु झाली होती. तांदूळ खरेदी वाढ होत असल्यामुळं येत्या काही महिनयांत तांदळाच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  


अन्न कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत, रेशन दुकानांमधून वितरणासाठी वर्षभरात सुमारे 400 लाख टन तांदूळ आवश्यक आहे. मात्र, केंद्र सरकारकडे 525 लाख टनांहून अधिक तांदूळ उपलब्ध आहे. सरकार मार्च 2024 पासून सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात जास्तीत जास्त गव्हाच्या खरेदीची तयारी करत आहे. यासाठी प्रमुख गहू उत्पादक राज्यांशी चर्चा करून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.


तांदळाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार तांदळाची विक्री करणार


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तांदळाच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार खुल्या बाजारात तांदळाची विक्री करणार आहे. पुढील आठवड्यापासून तांदळाची विक्री होणार आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. सरकार नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार यांच्या मदतीने थेट ग्राहकांना 29 रुपये किलो दराने तांदूळ विकणार आहे. 5 ते 10 किलोच्या पॅकमध्ये 'भारत' ब्रँड अंतर्गत तांदूळ विकला जाणार आहे. या निर्णयामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारने राईस मिल चालकांना दर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, असे असतानाही तांदूळ स्वस्त झाला नाही. अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ‘भारत’ ब्रँडखाली तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला. सरकारी आकडेवारीनुसार किरकोळ बाजारात तांदळाच्या किमतीत 14.5 टक्के आणि घाऊक बाजारात 15.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर कमी करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. तांदूळ वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Bharat Rice : स्वस्त डाळीनंतर, आता स्वस्त तांदूळ! फक्त 29 रुपये किलोने मिळणार 'भारत तांदूळ'