मुंबई : सलग वाढणाऱ्या सोन्याच्या दराला गेल्या चार दिवसांपासून ब्रेक लागला असून आजही सोन्याची किंमत स्थिर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) च्या व्यवहारानुसार, मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा दर हा 48,380 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 47,380 रुपये इतका आहे. चांदीच्याही दरामध्ये केवळ 50 रुपयांची वाढ झाली असून आता एक किलो चांदीसाठी 67,900 रुपये मोजावे लागणार आहेत.


गेल्या आठवड्याचा विचार करता 28 जुलै ते 30 जुलैपर्यंत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर गेली चार दिवस कोणताही बदल झाला नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.


अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणूकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. 


चांदीच्या दरात 31 जुलैला 300 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर काल त्यामध्ये 50 रुपयांची घसरण झाली तर आज पुन्हा 50 रुपयांची वाढ झाली. चांदीच्या किंमतीचा विचार करता 27 जुलैला त्यामध्ये 400 रुपयांची घसरण झाली होती तर 28 जुलैला त्यामध्ये 700 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर 29 जुलैला 800 रुपये तर 30 जुलैला 1000 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यापासून चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.


महत्वाच्या बातम्या :