Gold Rate : दसऱ्याआधीच सोन्याला पुन्हा एकदा चकाकी आली आहे. मुंबईत सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 62 हजारांवर गेले आहे. जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजार 800 रुपयांचा भाव आहे. दसऱ्याला सोने 64 हजार रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी सोन्याचे भाव 63 हजारपर्यंत गेल्याचं पाहायला मिळाले होते. 


दसरा, दिवाळी आणि लग्नाच्या सिझनला पुन्हा सुरुवात होणार असल्याचनं सोन्याची झळाळी परतली आहे.  दुसरीकडे, सोन्याच्या भाववाढीला जागतिक परिस्थिती देखील कारणीभूत आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्यात तेजी पाहायला मिळाली होती. 


36 तासात  सुवर्णनगरीत शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ


एकीकडे दसरा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून सोने खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र असून गेल्या 36 तासात जळगाव सुवर्णनगरीत शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी पूर्वी 60000 रुपये असलेले सोने आज 61000 हजार रुपये दरावर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


यंदा दसरा सण उत्साहात साजरा होणार असल्याची चिन्हे असून मात्र दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे आंतरराष्ट्रीय गणिते कोलमडली आहेत. त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर देखील झाल्याचे पाहायला मिळतं आहे. एकीकडे दसऱ्याच्या सणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे, त्याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीत झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या छत्तीस तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवस पूर्वी 6000 रुपये असलेले सोने आज 61000 हजार रुपये दरावर पोहोचले आहे. उद्या दसरा सण असून जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असून उद्या आणखी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सोने विक्रेत्यांचे मत आहे.