मुंबई: यंदाचं वर्ष हे जागतिक वित्तीय बाजारासाठी अस्थिर ठरल्याचं स्पष्ट झालं असून या एकाच वर्षात बाजारातील गुंतवणूकदारांचे 14 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान (Global equities are down by a whopping $14 trillion) झालं आहे. भारतीय रुपयात सांगायचं झालं तर हा आकडा 14 खरब डॉलर्स म्हणजे 1,15,79,47,00,00,00,000 रुपये इतका भरतो. दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला आधीच फटका बसला होता. त्यातच या वर्षाच्या सुरवातील रशिया-युक्रेन युद्धामुळे त्याच आणखीच भर पडली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान होणाऱ्या वर्षाच्या यादीत 2022 सालाचा दुसरा क्रमांक लागतोय. असं असलं तरी भारतीय अर्थव्यवस्थेला तितक्या प्रमाणात फटका बसला नसल्याचं स्पष्ट आहे. 


जागतिक बाजारपेठेतील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकन ट्रेझरी आणि जर्मन बॉंडमध्येही या वर्षात अनुक्रमे 16 टक्के आणि 24 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. एकेकाळी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधणाऱ्या क्रिप्टोकरन्सीलाही याचा फटका बसला असून त्यामध्ये सध्या मंदीचं चित्र आहे. बिटकॉईनची किंमत 60 टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरली आहे. 


World Bank Report On India: जगाला झटका मात्र भारतीय अर्थव्यवस्था सावरली


जगभरातल्या अर्थव्यवस्थांना जरी फटका बसला असला तरी भारतीय अर्थव्यवस्था मात्र सावरली, भारतीय अर्थव्यवस्थेला तेवढ्या प्रमाणात धक्का बसला नसल्याचं जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटलं आहे. 


अमेरिका, रशिया आणि युरोपीतील विकसित देश जरी अर्थव्यवस्थेतील मंदीचा सामना करत असले तरी भारत मात्र त्यापासून दूर आहे. जागतिक वित्तीय परिस्थितीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला तितकासा बसला नाही असं जागतिक बँकेने म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने या बिकट परिस्थितीमध्ये लवचिकता दाखवली आहे. तसेच अनेक उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची कामगिरी सरस आहे. भारतातील सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेल्या सुधारणा यासाठी कारणीभूत असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. 


या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजाराने आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टी इंडेक्सने या आधी 18,800 पर्यंत मजल मारली होती. 


Raghuram Rajan On Indian Economy: पुढचं वर्ष हे जगासाठी आव्हानात्मक, रघुराम राजन यांचा इशारा 


पुढील वर्ष हे भारतासाठी नव्हे तर जगातील अर्थव्यवस्थेसाठी अधिक आव्हानात्मक असणार असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी दिला आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक प्रकारे सुधारणा कराव्या लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. निम्न मध्यमवर्गीयांना केंद्रीत करून काही धोरणे आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.