Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सकाळी विधिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी (MVA) सभागृहाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मागील दोन दिवसांपासून सलग विरोधकांचे आंदोलन सुरु होताच पायऱ्यांवर पोहोचणारे सत्ताधारी आज मात्र अधिवेशनाच्या चौथ्यादिवशी थोडे लेट झाले. विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याने विधानभवन इमारत परिसरात काही काळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.


एयू एयू कौन है...




राज्यपाल (Maharashtra Governor) हटाव-महाराष्ट्र बचाव, भ्रष्टाचाराचे खोके-मुख्यमंत्री ओके, दिल्लीचे मिंधे-एकनाथ शिंदे, 50 खोके-भूखंड ओके अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर श्रीखंडाचा मोठा प्रातिनिधीक डबा डोक्यावर घेऊन विरोधकांनी परिसरात श्रीखंड वाटले. भूखंडाचे श्रीखंड सर्वांनी खावे, असे सांगत श्रीखंडाचे वाटप विरोधकांनी केले. हे सुरु असतानाच सत्ताधारी मैदानात उतरले आणि 'एयू एयू कौन है', 'मुंबईकरांना अपमानित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा त्रिवार निषेध', 'मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणणाऱ्यांचा निषेध' आदी घोषणा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.


पन्नास खोके अन् भूखंड ओक्के..




50 खोके-एकदम ओके, ही घोषणा जुनी झाली म्हणून पन्नास खोके-भूखंड ओकेच्या घोषणा देत आहोत, असे विरोधकांनी सांगितले. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री म्हणून कामच करत नाहीत, तर केवळ दिल्लीश्‍वरांच्या आदेशांचे पालन करत आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचा एकही मुख्यमंत्री अशा प्रकारे दिल्लीचा मिंधा झाला नव्हता. पण एकनाथ शिंदेंनी गद्दारी केल्यानंतर हे सुद्धा करून दाखवले. त्यामुळे दिल्लीचे मिंधे-एकनाथ शिंदे, म्हणत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत, असे विरोधकांनी सांगितले. 


एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी काल संसदेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या मोबाईल फोनवर एयू नावाचे मिस्ड कॉल असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर आज एयू एयू कौन है, असा प्रश्‍न विचारत सत्ताधारी विरोधकांवर बरसले. या प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत येणार असल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकाच वेळी परिसरात घोषणा देत आमने-सामने आले. त्यामुळे काह काळ अभूतपूर्व गोंधळ उडाला होता.


ही बातमी देखील वाचा


Nitesh Rane On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल : नितेश राणे