Gautam Adani :  गेल्या दोन दिवसांत (सोमवार आणि मंगळवार) अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत 16.71 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हे त्यामागचे कारण आहे. रुपयांमध्ये ही रक्कम मोजायची झाल्यास गेल्या 28 तासात अदानींच्या संपत्तीत दर मिनिटाला सुमारे 48.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


'ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स'नुसार, अदानीची एकूण संपत्ती आता 82.5 अब्ज डॉलर्स आहे. आजची म्हणजेच बुधवारची कमाई अजून यात समाविष्ट केलेली नाही. अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी 12.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर सोमवारी 4.41 अब्ज डॉलरची वाढ झाली. अशा प्रकारे, अदानी यांच्या संपत्तीत दोन दिवसांत एकूण 16.71 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1671 कोटी डॉलरची वाढ झाली आहे. 83.34 रुपये प्रति डॉलर या दराने पाहिल्यास ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये ₹1392627274500.00 आहे. जर आपण त्याला 48X60 ने भागले तर ही रक्कम 48,35,51,136 कोटी रुपये होईल. म्हणजेच गेल्या 48 तासांत अदानीने दर मिनिटाला 48.35 कोटी रुपये कमावले. 


यावर्षी संपत्ती गमावण्यात अदानी पहिल्या क्रमांकावर 


गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ होत असली तरी, यावर्षी संपत्ती गमावण्यात ते जगातील अब्जाधीशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अदानी समूहाविरुद्धच्या हिंडेनबर्ग अहवालाने त्यांची संपत्ती 130 अब्ज डॉलरवरून 50 अब्ज डॉलर इतकी कमी झाली होती. सध्या अदानीची संपत्ती आता 82.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या वर्षात आतापर्यंत 38 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.


सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 222 अब्ज डॉलर  इतकी आहे. या वर्षी आतापर्यंत मस्कने त्यांच्या संपत्तीमध्ये 85 अब्ज डॉलरची भर घातली आहे. जी अदानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. यंदाच्या आतापर्यंतच्या कमाईच्या बाबतीतही मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहे.


दरम्यान, रविवारी झालेल्या मतमोजणीत चार पैकी तीन राज्यात भाजपाला (BJP Won Assembly Elections) विजय मिळाला. भाजपाला मिळालेल्या यशाचा परिणाम भारतीय शेअर बाजारात (Share Market) दिसून आला. शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारात तेजी दिसून आली. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी तेजी दिसून आली. त्यानंतर हिंडेनबर्गने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले असल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर अदानी समूहातील सगळ्याच कंपन्यांच्या शेअर दरात मोठी तेजी दिसून आली आहे.