Fuel Price Hike and Reliance Petrol Pump : रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू असले तरी त्याचा परिणाम जगातील इतर देशांवरही होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अधिक वाढले आहेत. त्यामुळे इंधन कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. भारतातील इंधन कंपन्यांवर याचा परिणाम होत आहे. रिलायन्सच्या मालकीचे पेट्रोल पंप पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सुरू पुन्हा सुरू झाली आहे. याआधी 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर रिलायन्सने देशभरातील सर्व पेट्रोल पंप बंद केले होते. पुन्हा एकदा तशी परिस्थिती ओढावण्याची भीती डिलरकडून व्यक्त केली जात आहे. 


कोरोना महासाथीच्या काळात रिलायन्ससह इतर खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपला मोठा फटका बसला होता. लॉकडाउनमुळे ग्राहकांकडून होणारी इंधन खरेदी जवळपास ठप्पच झाली होती. आता इंधन दरवाढीचाही रिलायन्सच्या पेट्रोल पंपधारकांना फटका बसत असल्याचे 'इकॉनॉमिक्स टाइम्स'ने म्हटले. 


रिलायन्स पेट्रोल पंपच्या डिलरने म्हटले की, मागील चार दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात 2.40 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, आमच्याकडे सध्या विक्रीसाठी पेट्रोल-डिझेल नाही. चार नोव्हेंबर 2021 पासून ते 21 मार्च यापर्यंतच्या कालावधीत कच्च्या तेलाची किंमत 82 डॉलर प्रति बॅरलने वाढून 111 डॉलरच्या आसपास झाली आहे. विविध आव्हाने असली तरी इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी रिलायन्सकडून प्रयत्न सुरू असल्याचे डिलरने म्हटले. 


2008 मध्ये पेट्रोल पंप झाले होते बंद


सन 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 150 बॅरल प्रति लिटर इतके झाले होते. त्यावेळेस रिलायन्सने पेट्रोल पंप बंद केले होते. रिलायन्स सरकारी इंधन कंपन्यांप्रमाणे अनुदानित दरात इंधन विक्री करू शकत नाही. सरकारी कंपन्यांना सरकारकडून अनुदान दिले जाते. रिलायन्सने काही दिवसांपासून डिलरांसाठीच्या डिझेलचा पुरवठा कमी केला होता. 


किती आहेत पेट्रोल पंप?


रिलायन्सकडून देशभरात जिओ-बीपी या ब्रांडने पेट्रोल पंप चालवले जातात. रिलायन्स-बीपी मोबिलिटी लिमिटेडचा हिस्सा आहे. याची स्थापना 2020 मध्ये झाली होती. भारत पेट्रोलियमने यामध्ये 7000 कोटींमध्ये 49 टक्के भागिदारी खरेदी केली होती. सध्या याचे देशभरात 1400 पेट्रोल पंप आहेत. आगामी काळात कंपनीने ही संख्या 5500 इतकी करण्याचा नियोजन केले होते. त्यासाठी 3000 कोटींच्या गुंतवणूकीचा एक योजनाही आखण्यात आली आहे. 


IOC, BPCL, HPCL कंपन्यांचे 19,000 कोटींचे नुकसान


गेल्या पाच महिन्यांमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. त्यामुळे  IOC, BPCL, HPCL या देशातील टॉप तीन पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल 19 हजार कोटी रुपयांना सामोरं जावं लागलं असल्याचं मूडीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे. बाजारातील सध्याची स्थिती पाहता पेट्रोलियम वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर दररोज 25 डॉलर प्रति बॅरेल आणि डिझेलच्या किंमतीवर 24 डॉलर प्रतिबॅरेल नुकसान होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: