Foreign Portfolio Investors: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय शेअर बाजारात (FPI Investment in Share Market) गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आहे. मागील महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढत असल्याचे दिसून आले. महागाईबाबतची चिंता (Inflation Rate) कमी झाल्याच्या परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवली आहे. 


डिपॉझिटरीने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात एफपीआयने शेअर बाजारात जवळपास पाच हजार कोटींची गुंतवणूक केली होती. सलग नऊ महिन्यांपासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू होता. मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून विक्री सुरू होती. त्यानंतर मागील महिन्यात, जुलैमध्ये खरेदी दिसून आली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22,452 कोटींची गुंतवणूक केली. 


एफपीआयने एक ते 12 ऑगस्ट 2022 या दरम्यानच्या काळात शेअर बाजारात 22,452 कोटींची गुंतवणूक केली. त्याशिवाय बॉण्ड बाजारात  1,747 कोटींची गुंतवणूक केली आहे. 


2.46 लाख कोटींच्या शेअर्सची विक्री


ऑक्टोबर 2021 ते जून 2022 पर्यंत एफपीआय गुंतवणूकदारांनी 2.46 लाख कोटींच्या शेअर्सची विक्री केली. कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी संशोधक श्रीकांत चौहान यांनी सांगितले की,  महागाईबाबतची चिंता दूर झाल्याने आणि मध्यवर्ती बँकेने पतधोरणाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्याच्या परिणामी एफपीआय गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारात परतले असून आगामी काळात गुंतवणूक वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महागाईत घट


जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.71 टक्क्यांवर आला आहे. मात्र, हा दर अजूनही रिझर्व्ह बँकेच्या अंदाजित दरापेक्षा अधिक आहे. खाद्यन्नांवरील दर कमी झाल्याने महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे. 


अमेरिकेतील महागाईचा उच्चांकी दरावर


अमेरिकेतील महागाईच्या दराने 40 वर्षांच्या उच्चांक गाठला होता. त्यानंतर अमेरिकेत जून महिन्यातील महागाईचा दर घटून 8.5 टक्के  इतका झाला. महागाईचा दर कमी झाल्याने अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आता पतधोरणात थोडी नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: