Luxury House in Delhi: भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची पत्नी वसुधा रोहतगी यांनी दिल्लीतील उच्चभ्रू परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्यांची किंमत 160 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. हा बंगला 2160 चौरस यार्ड म्हणजे जवळपास 19440 चौरस फूट इतका असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीतील या परिसरात घर खरेदी करण्यासाठी अनेक उच्चभ्रूंचा कल असल्याचे दिसून येत आहे.
कुठे खरेदी केली मालमत्ता
दिल्लीतील गोल्फ लिंक परिसरात ही मालमत्ता आहे. स्थिर किंमत आणि मोक्याची जागा यामुळे अनेकांचा कल या ठिकाणी घरे खरेदी करण्याकडे वाढत आहे. रोहतगी यांनी खरेदी केलेल्या या घराचे भूखंडाचे क्षेत्रफळ 1806.35 चौरस मीटर असून इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 1869.7 चौरस मीटर इतकी आहे.
'मनीकंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, या मालमत्तेची नोंदणी 24 फेब्रुवारीलाच पूर्ण झाली आहे. कुटुंबाने खरेदी केलेल्या मालमत्तेवर स्टॅम्प ड्युटी म्हणून 6.4 कोटी रुपये भरले आहेत. मुकुल रोहतगी यांनी या व्यवहाराला दुजोरा दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
यांनी देखील खरेदी केलेत आलिशान बंगले
मागील वर्षी, भारताचे माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांनी दिल्लीतील लुटियन्समधील सुंदर नगरमध्ये 866 स्क्वेअर यार्डचा विस्तीर्ण बंगला 85 कोटी रुपयांना खरेदी केला होता. माजी अॅटर्नी जनरलच्या घराच्या शेजारी रेटगेनचे भानू चोप्रा, मॅक्सॉप इंजिनियरिंगचे शैलेश अरोरा आणि डीबी ग्रुपचे पवन अग्रवाल आदी उद्योजक त्यांचे शेजारी वास्तव्यास आहेत.
दमानी यांच्या कुटुंबाने खरेदी केला महागडा बंगला
चोप्रा यांनी नुकताच 850 स्क्वेअर मीटरचा बंगला 125.5 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. फेब्रुवारीमध्ये, डी मार्टचे संस्थापक आणि शेअर बाजारातील ट्रेडर राधाकिशन दमाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली आहे. यामध्ये एकूण 1238 कोटी रुपयांच्या 28 निवासी युनिट्स खरेदी करण्यात आले.
राज कपूर यांच्या बंगल्याची, आरके स्टुडिओची विक्री
काही महिन्यांपूर्वीच गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने उच्च दर्जाचा निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी चेंबूरमध्ये राज कपूर यांचा बंगला विकत घेतला. राज कपूर यांचा बंगला देवनार फार्म रोड येथीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या जवळ आहे. त्याआधी आरके स्टुडिओचीदेखील विक्री करण्यात आली होती. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न आणि देखभाल खर्चाची सांगड घालता येत नसल्यामुळे आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला. आर. के. स्टुडिओ आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आहे. कित्येक सुपरहिट चित्रपटांचं चित्रीकरण या स्टुडिओमध्ये झालं. 'शो मॅन' राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. आग, बरसात, आवारा, श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी, राम तेरी गंगा मैली यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांचं शूटिंग या स्टुडिओमध्ये झालं होतं.