Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, आज आणि उद्या (30, 31 मार्च) दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी (Farmers) अति भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र, सावधानता बाळगावी असं आवाहन खुळे यांनी केलं आहे.


Rain : राज्यातील या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.


मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता


दरम्यान, 31 मार्चनंतर विदर्भात दोन दिवस म्हणजे 2 एप्रिलपर्यंत वातावरणाची तीव्रता जाणवू शकते. दरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. आजपासून (30 मार्च) महाराष्ट्रात वाढलेल्या तापामानत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. 


उत्तर भारतातही पावसाची शक्यता, पर्यटकांनी काळजी घ्यावी 


दरम्यान, वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर तसेच सभोवतालच्या परिसरात आजपासून पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन खुळे यांनी केलं.


अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका


दरम्यान, मागील दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. द्राक्ष, आंबा, केळी या फळबागांना मोठा फटका बसला होता. तर हरभरा, कांदा यासह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. सभागृहातही या मुद्यावरुन बराच गदारोळ झाला होता. दरम्यान,आता पुनहा तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज, शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता