Piyush Goyal : भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India) देशाच्या कानाकोपऱ्यातील लाभार्थ्यांना शिधा उपलब्ध करून देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या महत्वपूर्ण योजना सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, एफसीआयची भूमिका ही केवळ शिधा वितरीत करणे हीच नाही. तर लोकांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि दायित्व आणून शेतकरी आणि लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. भारतीय अन्न महामंडळानं शेतकरी आणि देशातील जनतेचा विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे यावं असे गोयल म्हणाले. एफसीआयच्या 60 व्या स्थापना समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. 


पंतप्रधानांकडून भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं आश्वासन


पंतप्रधानांनी भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे असेही गोयल म्हणाले. विकसित भारतच्या या वचनाची सुनिश्चिती करण्यासाठी, त्यांनी तरुणांना आणि एफसीआयच्या कर्मचार्‍यांना पारदर्शकता आणण्याचे आणि जागल्या बनण्याचे आवाहन केले. प्राधान्यक्रमाच्या दुसऱ्या क्षेत्राबाबत गोयल म्हणाले की, एफसीआयला गुणवत्तेबरोबरच  डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञान स्विकारण्याची गरज आहे. तपासणी, खरेदी, वाहतूक, वितरण आणि साठवणूक यांसारख्या क्षेत्रात गुणवत्ता आणता येते. यांत्रिक लोडिंग/अनलोडिंग, नाविन्यपूर्ण साठवणूक संकल्पना आणि इतर गोष्टींचा अवलंब करत क्रियान्वयनाचा खर्च कमी करण्याची सूचनाही त्यांनी केली.


एफसीआयने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली किमंत दिली


एफसीआयची खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत ) कार्यक्रम देखील ग्राहकांच्या फायद्यासाठी गहू आणि तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले. एफसीआयने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाजवी किंमत दिली आहे. कोणत्याही शेतकऱ्याने नुकसान सोसून मालाची विक्री करु नये याची काळजी घेतल्याचे ते म्हणाले. महामंडळानं एकत्रितपणे शेतकऱ्यांशी संवाद वाढवण्याचं काम सुरु ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. एफसीआयने आता उत्तम देखरेख, पायाभूत सुविधा सुधारत डिजिटलायझेशनचा अवलंब करणे, खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणे उभारणे, अन्नधान्य खरेदी सुलभ करणे, चांगल्या साठवणुकीसाठी पोलादी भांडारगृहे बांधणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा आधुनिक युगात प्रवेश केल्याचे गोयल यांनी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या:


FCI कडून गहू आणि तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध होणार, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा