Fuel Subsidy on Indian Oil: बदलत्या काळानुसार भारतात डिजिटलायझेशनचा विस्तार झपाट्याने होत आहे. सध्याच्या काळात अगदी छोट्या कामासाठीही इंटरनेटचा वापर केला जातो. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी, त्याचे सत्य जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. 


काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सरकारी इंधन कंपनी आपल्या ग्राहकांना 6,000 रुपये अनुदान देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्हीही हा व्हायरल मेसेज पाहिला असेल आणि तुम्हालादेखील ही अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी इच्छा असेल. मात्र, त्याआधी या मेसेजबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. 


पीआयबी फॅक्ट चेकने काय सांगितले? (PIB Fact Check)


सध्या व्हायरल होणाऱ्या मेसेजनुसार, इंडियन ऑइलने एक प्रश्नावली तयार केली असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास तुम्हाला कंपनीकडून 6,000 रुपयांचे अनुदान मिळेल असा दावा करण्यात आला आहे. पीआयबीने या व्हायरल मेसेजची सत्यता तपासली. हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने असे कोणतेही अनुदान जाहीर केलेले नाही. हा फेक मेसेज असून अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पीआयबीने केले आहे. 






वैयक्तिक माहिती, तपशील देणे टाळा


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवणे टाळले पाहिजे. तुमची वैयक्तिक माहिती अजिबात शेअर करू नका. जर कोणी तुम्हाला असा मेसेज पाठवला तर तुमचा बँक तपशील जसे की खाते क्रमांक, क्रेडिट डेबिट कार्ड क्रमांक, आधार क्रमांक आणि पॅन कार्ड तपशील कोणालाही देऊ नका. व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता पडताळून पाहा. 


PIB द्वारे तुम्ही सत्यता पडताळून पाहू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर व्हिडिओ पाठवू शकता आणि सत्यता पडताळून पाहू शकता.