मुंबई : ईपीएफओने (EPFO) नुकतेच व्याजाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता ईपीएओ खातेदारांकडून जाहीर करण्यात आलेले व्याज आमच्या खात्यावर कधी जमा होणार, असे विचारले जात आहे. व्याजाची घोषणा होऊन अनेक दिवस झालेले असले तरी अद्याप खादेधारकांना ते मिळालेले नाही. खातेधारकांनी त्याबाबत विचारणा केल्यास लवकरच तुमचे व्याज तुमच्या खात्यावर जमा होईल, असे ईपीएफओकडून सांगितले जात आहे. पण त्याबाबतची निश्चित तारीख मात्र सांगितली जात नाहीये. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ईपीएफओ खातेधारकांनी त्यांचे व्याज जमा झालेले आहे, की नाही हे कसे तपासायचे हे जाणून घेऊ या.


यावर्षी व्याजदरात वाढ


आर्थिक वर्ष 2023-24 चे व्याज कधी जमा होणार, असे अनेकजण विचारत आहेत. पण तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. नियमानुसार तुम्हाला व्याज दिले जाईल, असे ईपीएफओकडून सांगितले जात आहे. ईपीएफओने 2023-24 सालासाठी व्याजदारात काहीशी वाढ केलेली आहे. याआधी हा दर 8.15 टक्के होता. आता तो वाढवून 8.25 टक्के करण्यात आला आहे. याचा फायदा देशातील लाखो ईपीएफओ खातेधारकांना मिळणार आहे.  


याआधी किती मेंबर्सना मिळाले होते व्याज 


मार्ज 2024 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफओने देशभरातील 28.17 कोटी ईपीएफ सदस्यांना व्याज दिलं होतं. खातेधारकांनी हे व्याज जमा झाले आहे का? ते तपासून घ्यावं असं ईपीएफओने सांगितलं होतं.  


व्याज जमा झालंय की नाही, कसं तपासायचं? (How to Check PF Balance)


तुमच्या ईपीएफओ खात्यावर व्याज जमा झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी उमंग अॅपची मदत घेता येते. हे अॅफ डाऊनलोड केल्यानंतर लॉग इन करावे आणि तेथे व्याज जमा झाले आहे की नाही हे तपासावे. 


ईपीएफओ संकेतस्थळ : तुमच्या खात्यावर व्याज जमा झाले आहे की नाही, हे तपासण्यासाठी ईपीएफओचे संकेतस्थळ हादेखील एक चांगला पर्याय आहे. या संकेतस्थळावर जाऊन इम्प्लॉईज लॉगीन हा ऑप्शन निवडावा. त्यानंतर सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करावे. या सेक्शनमध्ये जाऊन मेंबर पासबुक यावर क्लीक करावे. त्यानंतर तुमचा यूएएन नंबर  आणि पासवड, कॅप्चा टाकावा. त्यानंतर तुम्हाला पासबुकवर व्याज जमा झाले आहे की नाही हे समजेल.


एसएमएस सुविधा : एसएमएसच्या मदतीनेही तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यावर व्याज जमा झाले आहे की नाही हे जाणून घेता येईल. त्यासाठी तुम्हाला 7738299899 या मोबाईल क्रमांकावर “EPFOHO UAN” असा मेसेज टाकावा लागेल. त्यानंतर 9 भाषांपैकी कोणत्याही भाषेत तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती मिळू शकते. 


मिस्ड कॉल सर्व्हिस : मिस्ड कॉल सर्व्हिसनेही तुम्हाला तुमच्या ईपीएफओ खात्याची माहिती मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईपीएफओ खात्याची माहिती दिली जाईल. 


हेही वाचा :


आरोग्य, जीवन ते दुर्घटना, आता एकाच पॉलीसीत मिळणार वेगवेगळे विमा लाभ; जाणून घ्या!


एटीएम मशीनमधून पैसे काढताय? नवा फ्रॉड आला, सावधान व्हा; अन्यथा तुमचं बँक खातं होईल रिकामं!


प्राप्तिकर आणि TDS यात नेमका फरक काय? 'हे' वाचा गोंधळ दूर होईल!