मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सादर केला. या अधिवेशनात राज्य सरकारनं राज्यातील विविध घटकांसाठी योजनांची घोषणा केली. यामध्ये महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) , शेतकरी, आरक्षित प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण, यासह युवकांसोठी योजना जाहीर केल्या. युवकांच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10 हजार रुपये स्टायपेंड म्हणून देण्यात येणार आहेत.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती सांगताना आम्ही लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडक्या भावांसाठी देखील योजना आणल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे म्हणाले काही लोकं म्हणाले लाडकी बहीण केलं, लाडक्या भावाचं काय?मग  लाडक्या भावाचं पण केलं. आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला 8 हजार, डिग्री झालाय त्याला 10 हजार रुपये महिन्याला मिळतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी केलेली घोषणा



युवक त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल. प्रशिक्षित असं कौशल्य असलेलं  मनुष्यबळ आपल्या उद्योजकांना मिळेल. ते पैसे जे आहेत ते सरकार भरणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. लोकं बेरोजगारी म्हणाले मग त्याच्यावर आपण हा उपाय काढला. कारखान्यात तो अप्रेंटिसशिप करेल त्याचा स्टायपेंड सरकार भरेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?


कौशल्य विकास, रोजगार व  उद्योजकता आयुक्त यांच्याकडून  ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसात तयार केली जाईल. त्यानुसार बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेच्या अटी कोणत्या?


1. योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.


2. उमेदवार बारावी उत्तीर्ण/आयटीआय /पदविका/ पदवी आणि पदव्युत्तर असावा.


3.शिक्षण चालू असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.


4. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.


5. आधार नोंदणी असावी, बँक खाते आधार संलग्न असावे.


6. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.


7. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योग किंवा आस्थापनेकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.


संबंधित बातम्या : 


Fact Check : खरंच लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडका भाऊ योजना सुरु केलीय का? बारावी पास असल्यास 6 हजार रुपये कसे मिळणार?


CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार