Edible Oil Price Hike : महागाईनं सर्वसामान्य बेहाल झाले आहेत. अशातच देशात आता खाद्य तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. सरकारचं मत आहे की, इंडोनेशियातून (Indonesia) पामतेल (Palm Oil) निर्यातीवर बंदी घातल्यानं पुरवठा विस्कळीत झाला आहे. परंतु सध्या सरकारकडे पाम तेला पुरेसा साठा आहे. केंद्रीय खाद्यान्न सचिव सुधांशू पांडे यांच्या म्हणण्यानुसार, सरकारकडे 40 ते 45 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. तसेच, इंडोनेशिया लवकरच पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवेल अशी सरकारला आशा आहे.


सुधांशू पांडे पुढे बोलताना म्हणाले की, इंडोनेशियामध्ये 407 लाख मेट्रिक टन पाम तेलाचं उत्पादन केलं जातं. तर विक्री फक्त 200 लाख मेट्रिक टन आहे. अशा परिस्थितीत इंडोनेशियाकडे लवकरच निर्यातीवरील बंदी उठवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.


एका रात्रीत तोडगा निघणार नाही : केंद्रीय खाद्यान्न सचिव 


सुधांशू पांडे म्हणाले की, बंदी उठवल्यानंतर पामतेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत होईल, त्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, खाद्यतेलाचा प्रश्न एका रात्रीत सुटू शकत नाही. कारण भारताला खाद्यतेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. ते म्हणाले की, कृषी मंत्रालय राष्ट्रीय तेलबिया अभियानावर काम करत असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.


...म्हणून भारतात खाद्यतेलाचे भाव वधारले


भारत आपल्या गरजेच्या 60 टक्के पेक्षा जास्त पामतेल आयात करतो. जगातील सर्वात मोठ्या पाम तेल उत्पादक इंडोनेशियानं देशांतर्गत गरजेमुळे पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ज्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. त्यामुळे सध्या खाद्यतेलाचे भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारतात येणारे 2,90,000 टन खाद्यतेल इंडोनेशियाच्या बंदरात अडकलं आहे. इंडोनेशियाने क्रूड पाम तेल आणि रिफाइंड पाम तेल निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतात खाद्य तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खरं तर, इंडोनेशियानं 28 एप्रिल 2022 पासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशिया पाम तेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या खाद्यतेलाचा - विशेषतः पाम तेल आणि सोया तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे.