ED Probe Against Paytm Payments Bank: गेल्या अनेक दिवसांपासून अडचणींमधून जाणाऱ्या पेटीएमला (Paytm) आणखी एक धक्का बसला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधातील (Paytm Payments Bank) आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीनं (ED) चौकशी सुरू केली आहे. ईडीनं पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध प्राथमिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, आज शेअर मार्केट सुरू होताच पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. ईडीनं पेटीएम पेमेंट्स बँकेवरील आरोपांबाबत तपास सुरू केला आहे. 


आज पुन्हा पेटीएमचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला


Paytm ब्रँडची मूळ कंपनी One97 Communications Limited च्या शेअर्समध्ये आज सकाळच्या सत्रात पुन्हा 10 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि ती लोअर सर्किटवर पोहोचली. या घसरणीनंतर आज पेटीएमचे शेअर्स पुन्हा आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर आले. शेअर्सनी आज प्रति शेअर 342.15 रुपयांची निचांकी पातळी गाठली, जी गेल्या 52 आठवड्यांमधील निचांकी पातळी आहे.


पेटीएमचे शेअर्स एका वर्षातील सर्वात निचांकी पातळीवर 


One97 Communications चे शेअर्स दोन्ही प्रमुख बाजारांमध्ये पहिल्यांदाच 350 रुपयांच्या खाली आले आहेत आणि हे त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 55 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. ऑक्टोबरमध्ये पेटीएम शेअर्सची पातळी 761.20 रुपये होती आणि पेटीएमची आजची निचांकी पातळी 342.15 रुपये आहे, म्हणजेच पेटीएम शेअर्सच्या किमतींत थेट 55 टक्के घट झाली आहे.


RBI कडून पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईचा आढावा घेण्यास नकार 


पेटीएमचे शेअर्स मंगळवारी पहिल्यांदा 400 रुपयांच्या खाली दिसले आणि आज ते 350 रुपयांच्या खाली गेले. आधीपासूनच अडचणीत असलेल्या पेटीएमच्या अडचणीत ईडी चौकशीमुळे अजून वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बँकेनं सोमवारी पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध कोणत्याही कारवाईचा आढावा घेण्यास नकार दिला होता. 


पेमेंट्स बँकेच्या अडचणी वाढणार


पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेत केवायसी नसलेली अनेक खाती आढळून आली आहेत, ज्यासाठी याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाला (ED) ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मनी लाँड्रिंगसारख्या बेकायदेशीर कामांचे पुरावे आढळल्यास, पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध ईडीची चौकशी सुरू केली जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम बँकेत निष्क्रिय खाती देखील मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत.


मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळले


दरम्यान, पेटीएम पेमेंट बँकेच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की, ''पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि पेटीएम पेमेंट्स बँकेची आतापर्यंत ईडीकडून कधीही चौकशी करण्यात आलेली नाही. आमचे प्लॅटफॉर्म वापरणारे काही व्यापारी चौकशीला सामोरे जात आहेत. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच योग्य ती उत्तरे दिली आहेत. आम्ही मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळतो आणि तुम्हा सर्वांना सट्टेबाजीपासून सावध करतो.''


आरबीआय, ईडी, अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पीएमओ गप्प


विविध मीडिया कंपन्यांशी संपर्क साधूनही आरबीआय, ईडी, वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पीएमओ यांनी याप्रकरणावर कोणतीही माहिती दिलेली नाही. बुधवारी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीपर्यंत ठेवी आणि वॉलेटसह त्यांचे बहुतांश व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. नियमांचे पालन न केल्याच्या आरोपावरून आरबीआयने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेचे शेअर्स कोसळले होते. कंपनीचे बाजारमूल्यही झपाट्यानं घसरलं आहे.