Oxfam Inequality Report : गेल्या काही वर्षांत जगभरात आर्थिक विषमता झपाट्याने वाढली (Economic disparity increased) आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने श्रीमंती आणि गरिबी यांच्यातील वाढत्या दरीबाबत एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे काही लोक मोठ्या प्रमाणात श्रीमंत होत आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधी लोक गरीब होत असल्याचे अहवालात दिसून आले आहे. पुढील 229 वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही, अशी भीती ऑक्सफॅमने व्यक्त केली आहे.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमोर अहवाल प्रसिद्ध


ऑक्सफॅम इंटरनॅशनलने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या मेळाव्यापूर्वी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की डेस्टिनेशन दावोस येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन केले जाते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या वार्षिक कार्यक्रमात अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, मोठे राजकारणी आणि उद्योगपतींचे नेते जमतात.


आर्थिक विषमता का वाढली?


ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, आर्थिक विषमतेच्या दृष्टीने गेली काही वर्षे अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या चार वर्षात कोरोना महामारी, युद्ध आणि महागाई या कारणांमुळं कोट्यवधी लोक गरीब झाले आहेत. 2020 नंतर, आतापर्यंत जगभरात सुमारे 5 अब्ज लोक गरीब झाले आहेत. दुसरीकडे काही निवडक लोकांची संपत्ती रॉकेटच्या वेगाने वाढली आहे.


टॉप 5 श्रीमंतांची संपत्ती इतकी वाढली


इनक्वालिटी इंक नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या 4 वर्षांत जगातील टॉप 5 श्रीमंतांच्या संपत्तीत 869 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की गेल्या चार वर्षांत जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींनी दर तासाला 14 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. जर आपण ही रक्कम भारतीय चलनात रुपांतरित केली तर ती अंदाजे 116 कोटी रुपये होते. याचा अर्थ, जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या 4 वर्षात दर तासाला 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.


या आहेत जगातील 5 श्रीमंत व्यक्ती


फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आहे. त्यांची सध्याची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट 182.4 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेझोस 176.9 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन 135.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आणि मार्क झुकरबर्ग 132.3 अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहे. ऑक्सफॅमच्या अहवालात, वॉरन बफे यांना पाच श्रीमंत लोकांमध्ये झुकेरबर्गच्या जागी स्थान देण्यात आले आहे, जे सध्याच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत सहाव्या स्थानावर घसरले आहेत.


229 वर्षे गरिबी हटणार नाही


जगातील सर्व अब्जाधीशांची निव्वळ संपत्ती एकत्र केली तर 4 वर्षात ती अनेक मोठ्या देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक वाढली आहे. अहवालानुसार, गेल्या 4 वर्षांत जगभरातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 3.3 ट्रिलियन डॉलरने वाढली आहे. भारताचा जीडीपी, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सध्या सुमारे 3.5 ट्रिलियन डॉलर आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जगाला लवकरच एक ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती असलेला पहिला अब्जाधीश मिळेल, तर पुढील 229 वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही, अशी भीती ऑक्सफॅमने व्यक्त केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तान खूपच मागे, गरिबी दूर करण्यासाठी पाकिस्ताननं काय करावं? जागतिक बँकेनं दिल्ला 'हा; सल्ला