Festive Bonus in States : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं (central Government) सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं होतं. सरकारनं महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करुन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर विविध राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. काही राज्यांनी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ जाहीर केली आहे. पाहुयात कोणकोणत्या राज्यांमधील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. 


केंद्र सरकारने केली चार टक्क्यांची वाढ 


18 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 4 टक्के डीए वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. हा निर्णय 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. यामुळं  सध्या डीएचा सध्याचा दर 46 टक्के झाला आहे.


आसाममधील पाच लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट 


केंद्राप्रमाणेच आसामच्या हिमंता बिस्वा सरमा सरकारनेही महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे. आसाममध्ये सुमारे पाच लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे. आसाममध्ये एकूण डीए आता 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटर याबाबत पोस्ट केली आहे. 


योगी सरकारनेही केली DA मध्ये वाढ, 2100 कोटी रुपये खर्च होणार


उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के केला आहे. त्यामुळं राज्य सरकारला सुमारे 2100 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रगतीत योगदान देणारे सर्व राज्य कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक आणि तांत्रिक शैक्षणिक संस्था, शहरी संस्था, यूजीसी कर्मचारी, कामावर काम करणारे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे सर्व अराजपत्रित, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि दैनंदिन वेतन कामगारांना 30 दिवसांच्या मानधन बोनस म्हणून दिला जाणार आहे. राज्यातील 14.82 लाख कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे.


राजस्थाननंतर छत्तीसगडने निवडणूक आयोगाकडे मंजुरी मागितली


छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्य कर्मचार्‍यांना केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता दिला जाईल. छत्तीसगड सरकारने निवडणूक आयोगाकडे महागाई भत्ता देण्याची परवानगी मागितली आहे. यापूर्वी राजस्थान सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान एक प्रस्ताव तयार करुन निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. परवानगी मिळाल्यानंतर राजस्थानमधील कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आली. यावर्षी छत्तीसगड सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे.


चंदीगड आणि तामिळनाडू सरकारकडूनही कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट


तामिळनाडू सरकार आणि चंदिगड प्रशासनानेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडू सरकारच्या म्हणण्यानुसार, ही वाढ 1 जुलैपासून लागू होणार असून त्याचा फायदा 16 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळं सरकारी तिजोरीवर 2500 कोटींहून अधिकचा बोजा पडणार आहे.


महाराष्ट्र सरकारही कर्मचाऱ्यांना देणार दिवाळी भेट


महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट (Diwali 2023) दिली असून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या आधी जून महिन्यात राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं. आता त्यात दोन टक्क्यांची वाढ करून तो 44 टक्के इतका करण्यात आला आहे. या संबंधित निर्णय हा बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra cabinet Meeting) होणार असल्याची माहिती आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


DA Hike: राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ होणार