मुंबई : सध्या आयटीआर भरण्यासाठी (ITR Filing) लोकांची लगबग चालू आहे. पण आयटीआर भरण्याच्या शेवटच्या तारखेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही जण आयटीआर भरण्याच्या शेवटच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं सांगत आहेत. याच कारणामुळे भारतीय प्राप्तिकर विभागाने अधिकृत स्पष्टीकरण देऊन आयटीआर भरण्याच्या शेवटच्या तारखेबाबत सांगितलं आहे.
नेमका दावा काय केला जातोय?
अनेकजण आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आल्याचं सांगत आहे. या दाव्यानुसार आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आयटीआर भरता येईल, असे म्हटले जातेय. एका गुजराती दैनिकातील वृत्ताचा आधार घेत तसा दावा केला जातोय. पण आता समाजमाध्यमावर चालू असलेल्या याच चर्चेवर प्राप्तिकर विभागाने माहिती दिली आहे. सध्या समाजमाध्यमांवर पसवरण्यात येणाऱ्या बातमीत काहीही तथ्य नाही, असं प्राप्तिकर विभागाने म्हटलंय. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षात आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 हीच राहील, असं प्राप्तिकर विभागाने सांगितल आहे. 31 जुलैनंतर तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
आतापर्यंत चार कोटी लोकांनी भरला आयटीआर
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्यामुळे लोकांची आयटीआर भरण्यासाठी लगबग चालू आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 22 जुलै 2024 पर्यंत चार कोटी लोकांनी आयटीआर दाखल केला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा 8 टक्क्यांनी अधिक आहे. 7 आणि 16 जुलैपर्यंत अनुक्रमे 2 आणि 3 कोटी लोकांनी आयटीआर दाखल केला होता. गेल्या वर्षी 4 कोटीचा आकडा हा 24 जुलै रोजी पार झाला होता.
अंतिम मुदतीत वाढ करावी, अशी मागणी का होतेय? (ITR Filing last date)
सध्या लोक प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आयटीआर भरत आहेत. पण या प्रक्रियेदरम्यान, लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक करदाते आणि चार्टर्ड अकाउंन्टट्स पोर्टलवर वेगवेगळ्या अडचणी येत असल्याची तक्रार करत आहेत. याच कारणामुळे गुजरात फेडरेशन ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स, ICAI आणि कर्नाटक चार्टर्ड अकाउन्टट्स असोशिएशन या संघटनांनी आयटीआर भरण्याची तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा :
आता फ्रान्समध्येही अंबानींचा बोलबाला, नीता अंबानींच्या खांद्यावर ऑलिम्पिकची मोठी जबाबदारी!
Kisan Credit Card: 'या' शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण...