Kisan Credit Card: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी 5 नवीन राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) सुरु करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.


किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी गरजा, मत्स्यपालन आणि पशुपालन गरजा पूर्ण करण्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते. उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि इतर खर्च पूर्ण करण्यासाठी क्रेडिट मर्यादा दिली जाते.


या योजनेचे फायदा काय?


किसान क्रेडिट कार्डची कमाल वैधता 3 वर्षे आहे. पीक कापणीनंतर कर्जाची परतफेड केली जाते. 1.60 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षा ठेवीची आवश्यकता नाही. KCC धारकांना कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास 50,000 रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. तर इतर जोखमींसाठी त्यांना 25 हजार रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. KCC च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमाल 7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. परंतू, जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांना व्याजदरात 3 टक्के सूट दिली जाते. त्यामुळं त्यांना फक्त 4 टक्के व्याजदर भरावा लागतो.


अर्ज कसा करायचा?


या कार्डसाठी अर्ज करण्यासाठी किसान बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'KCC साठी अर्ज करा' हा पर्याय निवडा. आता शेतकरी अर्ज भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा. यशस्वी फॉर्म सबमिशन केल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक मिळेल. हा संदर्भ क्रमांक भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.


'या' शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही


जर एखाद्या शेतकऱ्याकडे आधीपासून कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे थकित कर्ज असेल, तर त्याला KCC मिळण्यात अडचण येऊ शकते. शेतकऱ्यांच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी बँका त्याचा क्रेडिट इतिहास तपासतील. जर शेतकरी बांधवाकडे जमिनीच्या मालकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रे नसल्यास त्यांचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तपासा. या योजनेचा लाभ 18 ते 75 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे लक्षात ठेवा की 60 वर्षांवरील अर्जदारांसाठी सहअर्जदार असणे आवश्यक आहे.


महत्वाच्या बातम्या:


कमी व्याजदरात कर्ज; कठीण काळात ठरते संजीवनी, शेतकऱ्यांनो सरकारची 'ही' योजना माहिती आहे का?