मुंबई : राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तर सत्ताधारी महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे सांगितले जाते. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर केली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. आम्ही अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवू, असे सांगितले होते. आता आम्ही सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखविली आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. 


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 


अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


कोणत्या राज्याला किती गुंतवणूक


तसेच, एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी), तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी), चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी), पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी), सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी), आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी), नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी) या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.   




कर्नाटक, दिल्ली, गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक


थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 साली 1,18,422 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आहे. तर 2023-24  साली 1,25,101 कोटींची गुंतवणूक आली आहे. ही गुंतवणूक गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात तसेच कर्नाटक यांना मिळालेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.


अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम


राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली, असेही फडणवीस यांनी एक्सच्या माध्यमातून सांगितले. 


हेही वाचा :


IPO येण्याआधीच आमिर खान, रणबीर कपूरने केली कोट्यवधीची गुंतवणूक, 'ही' कंपनी पाडणार पैशांचा पाऊस, पैसे ठेवा तयार!


फक्त 'या' दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, पडेल पैशांचा पाऊस!


Maharashtra Big Projects: महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?