Dassara Gold Rate : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसरा सणाकडं पाहिलं जातं. या दिवशी घर, प्लॉट, वाहने, कपड्यांसह विविध वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. या दिवशी अनेक ग्राहक हे सोनं खरेदीला पसंती देत असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेली सोनं खरेदी ही शुभ गोष्ट असते अशी अनेकांची श्रद्धा असते. त्यामुळे आपापल्या ऐपतीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. त्यामुळे अनेकांनी आज सोनं खरेदीला प्राधान्य दिलं आहे. पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 46,100 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 49,360 रुपये इतका आहे. मुंबईचा विचार करता 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 46,980 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रँमचा दर हा 47,980 इतका आहे. 


दसऱ्याच्या मुहूर्त साधत नाशिकमध्ये सोनं खरेदीला ग्राहकांनी गर्दी केलीय. मागील दोन वर्षाचे अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजया दशमीचे मुहूर्त टळल्यानंतर आजचा मुहूर्त साधत सोने खरेदीला उधाण आलाय. येणारी लग्नसराई, आणि गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्रधान्य दिलं जातंय, पारंपरिक दागिने खरेदी कडे महिलांचा कल दिसून येतोय  दिवसभरात शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.


आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरातील अनेक दुकानात ग्राहकांनी अशीच गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी याच दिवशी सोन्याचा दर हा 50 हजार इतका होता. आज तोच 48,500 इतका आहे.  मागील वर्षांच्या तुलनेत किंमत कमी असल्याने अनेक ग्राहकांनी याचा फायदा घेण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त साधल्याचं दिसतंय.


अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणूकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. 


गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांहून जास्त घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.


 



महत्वाच्या बातम्या :