Pune Rickshaw Fare : पुण्यात 8 नोव्हेंबर 2021 पासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन आधिकाऱ्यांनी पत्र काढलं आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 20 रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये भाडेदर लागू असणार आहे. 


पहिल्या दीड किलोमीटरला सध्या 18 रुपये भाडे घेतले जाते, ते आता 20 रुपये असणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला आता 12.19 पैसे घेतले जात होत, आता या दरात वाढ होऊन नवीन दरानुसार 13 रुपये घेण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. पुणे,पिंपरी चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थितीत होते. त्यामुळे आता पुणेकरांना डिझेल पेट्रोल गॅस नंतर आता ऑटो रिक्षावाढ दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.


पुढच्या महिन्यात 8 नोव्हेंबरपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत ही दरवाढी लागू केली जाणार आहे. रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारलं जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात या रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडं आकारलं जाईल. प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेंमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी 3 रुपये इतकं शुल्कही लागू करण्यात येणार आहे. 


8 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या दरवाढीसाठी रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी 8 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडेदरवाढ लागू असेल, अशी माहितीही देण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :