नाशिक  : देशभरातील सोन्याच्या किमतीत मागील एक वर्षात  मोठी घसरण झाली आहे.  56 हजारांचा टप्पा ओलांडणारे सोने आता 47 हजार 800 पर्यंत खाली आले आहे.  येत्या काळात पुन्हा सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.


जागतिक घडामोडीचा सोन्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. जेव्हा जेव्हा देशात, जगात अस्थिर वातावरण तयार होते तेव्हा तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. मागील वर्षी ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत कोरोनाची लाट आली होती.  महामारी सावट असल्यानं देशातच काय पण जगात अस्थिरता पसरली होती, चीनकडून कोरोना आला या समजुतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमोडिटी मार्केटमध्ये त्याचे पडसाद उमटले होते, त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर जाणवला. जागतिक पातळीवरच्या सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.


मध्यंतरीच्या काळात भारत चीन संबंध बिघडले होते, मात्र हळूहळू त्यावेळी ही सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेपाठोपाठ दुसरी लाट ही येऊन गेली,  अनेक बेरोजगारांना पुन्हा कुठे ना कुठे रोजगार मिळाला आहे, लोकांची क्रयशक्ती पुन्हा वाढू लागली असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे.  सोन्याची आयात ही मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढली आहे 63 टनाहून 121 टनांपर्यंत आयात वाढली आहे. सोन्याच्या किमती 45 हजारापर्यंत कमी झाल्या होत्या, त्याही गेल्या दीड दोन महिन्यापासून 47 ते 49 हजारच्या दरम्यान स्थिरावत आहेत तर चांदीही 63 ते 65 हजारच्या दरम्यान आहे.  रिअल इस्टेटसह इतर कमोडिटी तेजीत आहे.  इंधनासह इतर वस्तुंचे भाव वाढत आहे अशा वेळी सोने आणि चांदीच्या भावात काही प्रमाणात घसरण झाल्याने बाजारातील समतोल टिकून असल्याचा तज्ञाचा दावा आहे


सण उत्सवाच्या तोंडावर सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे, आज 47/48 हजारातील सोने दिवाळी पर्यंत 52 हजार तर चांदी 80 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होतं आहे.  त्यामुळे सध्याचा काळ गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधीचा काळ मानला जात आहे.