Monsoon 2023:  यंदाच्या वर्षातील पावसाने भारतातील अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्ये गेल्या काही आठवड्यांपासून पुराच्या तडाख्यात आहेत. पुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार यावेळी पुरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 10 ते 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


वादळाचाही फटका


देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI)  Ecowrap अहवालात नुकसानीचा अंदाज बांधण्यासाठी आकडेवारी देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पुरामुळे देशाचे 10,000 कोटी ते 15,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कालांतराने नैसर्गिक कारणांमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी ही चिंतेची बाब असल्याचे अहवालात मान्य करण्यात आले आहे. पुरापूर्वी बिपरजॉय वादळानेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते.


नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढली


एसबीआयच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताला नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसत आहे. 1990 नंतर भारताला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अहवालानुसार, 1900 ते 2000 या 100 वर्षांमध्ये भारतात नैसर्गिक आपत्तींची संख्या 402 होती, तर 2001 ते 2022 या 21 वर्षांत त्यांची संख्या 361 होती.


पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले


SBI ने नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर व्यतिरिक्त दुष्काळ, भूस्खलन, वादळ आणि भूकंप यांचा समावेश केला आहे. अहवालानुसार, सर्वात जास्त नुकसान पुरामुळे होत असल्याचे म्हटले आहे. एकूण नैसर्गिक आपत्तींपैकी 41 टक्के एकट्या पुराचा वाटा आहे. पुरानंतर वादळामुळे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. भारतातील नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानामागे विम्याचा अभाव हे एक प्रमुख कारण असल्याचे एसबीआयचे मत आहे.



इतके नुकसान एकट्या हिमाचलचे


उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सारखे डोंगराळ भाग आणि देशाची राजधानी दिल्ली या राज्यांना यंदाच्या पावसात अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. यापूर्वी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दावा केला होता की, गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसामुळे एकट्या त्यांच्या राज्याचे सुमारे 8,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


दिल्लीत पुराचे पाणी कमी होत असताना सापांचा वाढता धोका


दिल्लीत (Delhi) पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता सापांचा धोका वाढला आहे. दिल्लीचे वन आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय (Gopal Rai) म्हणाले की, पुराचे पाणी ओसरल्यानंतर यमुना नदीकाठच्या घरातून साप बाहेर पडण्याच्या तक्रारी, तसेच पूर मदत छावण्यांजवळ साप आढळून आल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन वनविभागाला रॅपिड रिस्पॉन्स टीम (Rapid Response Team) स्थापन करण्यास सांगितले आहे. या टीम सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम करतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच वनविभागाने यासाठी 1800118600 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.