Retail Inflation: महगाईने हैराण झालेल्या नागरिकांना आणि सरकारसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.  डिसेंबर महिन्यातही किरकोळ महागाई दरात घट (Retail Inflation Rate) झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये, किरकोळ महागाईचा दर 5.72 टक्क्यांवर ( Retail Inflation Eases) आला आहे. हा दर एका वर्षातील नीचांकी पातळीवर आहे.  किरकोळ महागाईचा दर हा नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्के नोंदवण्यात आला होता. डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर  घसरला असला तरी डिसेंबर 2021 च्या तुलनेत अधिक आहे. डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.66 टक्के होता.


डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थांचा महागाई दर 4.19 टक्के इतक नोंदवण्यात आला आहे. हा महागाईचा दर नोव्हेंबर 2022 मध्ये 4.67 टक्के इतके होता. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 7.01 टक्के होता. डिसेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईत घट नोंदवण्यात आली आहे. 


ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांची महागाई डिसेंबर महिन्यात 5.05  टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये हा महागाईचा दर 5.22 टक्के होता. तर शहरी भागात अन्नधान्य महागाईचा दर 2.80 टक्के नोंदवण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 3.69 टक्के इतका होता. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर 15.08 टक्क्यांवर आला आहे. तर फळांच्या भाववाढीचा दर दोन टक्के राहिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.51 टक्के, अंड्यांचा महागाई दर 6.91 टक्के आणि मसाल्यांच्या महागाईचा दर 20.35 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. 


महागाई दर आटोक्यात?


भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन ते सहा टक्के इतका महागाई दर निश्चित केला आहे. नोव्हेंबरनंतर आता डिसेंबरमधील महागाई दरही 6 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमधील महागाई दर हा 6 टक्क्यांहून अधिक होता. एप्रिल महिन्यात महागाई दर हा 7.79 टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वाढ केली. आरबीआयने मागील काही महिन्यात सातत्याने रेपो दरात वाढ केल्याने 4 टक्के असणारा रेपो दर हा सध्या 6.25 टक्के इतका झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयची पतधोरण आढावा बैठक आहे. या बैठकीत आरबीआयकडून व्याज दरात बदल करण्यात येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: