मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) मतदान संपल्यानंतर 1 जूननंतर भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार बहुमतात येणार आहे, असा अंदाज वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलच्या (Exit Polls) माध्यमातून अंदाज व्यक्त केला होता. याच एक्झिट पोलच्या अंदाजामुळे शेअर बाजाराने (Share Market) मोठी उसळी घेतली होती. प्रत्यक्ष निकालानंतर मात्र चित्र वेगळे राहिले. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसला. यावेळी भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. परिणामी 4 जून रोजी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. शेअर बाजारातील याच घडामोडींवर काँग्रेसने (Congress) काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi आणि भाजपचे (BJP) नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देशाच्या शेअर बाजारात मोठा घोटाळा करण्याचा कट रचण्यात आला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याच पार्श्वभूमीवर 1 मे ते 4 जून या काळात शेअर बाजारात नेमके काय घडले होते? हे जाणून घेऊ..


राहुल गांधी यांनी काय आरोप केला?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. मोदी आणि अमित शाह यांनी निवडणुकीदरम्यान गुंतवणुकीचा सल्ला का दिला? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का? भांडवली बाजारांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीमार्फत चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीच्या मालकीच्या माध्यमाला दोघांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला. याच सल्ल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर गुंतवणुकदारांचे शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या या सल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


भाजपने राहुल गांधी यांचा हा आरोप फेटाळला आहे. त्यांच्या आरोपांवर भाजपचे नेते पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत.  असे असताना राहुल गांधी वरील आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असं पियुष गोयल म्हणाले. 


1 मे ते 4 जून या काळात नेमकं काय घडलं?


दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा 1 जून रोजी संपला. त्यानंतर लगेच संध्याकाळी वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून निवडणुकीचा संभाव्य निकाल जाहीर केला. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सत्ता येईल. हे सरकार बहुमतात असेल, असा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला होता. याच अंदाजामुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती. 31 मे रोजी सेन्सेक्स 73885.60 तर निफ्टी निर्देशांक 22488.65 अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर 1 जून रोजी मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानंतर 3 जून रोजी या निर्देशांकात मोठी उसळी झाली. सेन्सेक्स अडीच हजार अंकांनी उसळळा तर निफ्टीमध्येही तीन टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्स 76468.78 अंकावर पोहोचला तर निफ्टी 23263.90 अंकांवर जाऊन पोहोचला. या काळात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १३.७८ लाख कोटी रुपयांची भर पडली.


निकालाच्या दिवशी लोकांचे 31 लाख कोटी बुडाले


पुढे चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजप बहुमतात सरकार स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे या निकालाच्या दिवशी गुंतवणूकदारांचे साधारण 31 लाख कोटी रुपये बुडाले. त्यानंतर आता 5 आणि 6 जून रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार देशात स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुधारणा झाली. या दोन दिवसांत गुंतवणूकदारांनी 21 लाख कोटी रुपये पुन्हा कमवले.  


हेही वाचा :


Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी


एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा मोदी सरकारचा अंदाज, शेअर बाजार उघडताच मोठी उसळी, सेन्सेक्स 2200 अंकानी वधारला