मुंबई: अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तसेच बजेटच्या तोंडावर शेअर बाजारमध्ये सुरू असलेली अस्थिरता आजही कायम राहिली आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 581.21 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 167.80 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,276.94 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,110.20 वर पोहोचला आहे. सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये मात्र चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. 


आज 1447 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1832 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 90 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.


बाजार सुरू झाल्यावर घसरण
शेअर बाजाराच्या प्री-ओपन सत्रापासूनच बाजारात घसरण होण्याचे संकेत मिळत होते. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 996.23 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 57 हजारांखाली आला. निफ्टीतही घसरण दिसून आली. निफ्टीत जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण होऊन निर्देशांक 17 हजाराच्या नजीक पोहचला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने बाजारात घसरण झाली असल्याची चर्चा आहे. शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे. 


आज बाजार बंद होताना HCL Technologies, Tech Mahindra, Dr Reddy’s Laboratories, TCS आणि  Wipro यांच्या Nifty मध्ये घसरण झाली आहे. तर  Axis Bank, SBI, Maruti Suzuki, Cipla 
आणि  Kotak Mahindra Bank यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. 


आज बाजार बंद होताना सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर ऑटो, आणि खासगी बँकांच्या इंडेक्समध्ये 0.3 ते 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच FMCG, रिअॅलिटी, फार्मा, मेटल आणि आयटी कंपन्यांच्या इंडेक्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.8 ते 1.2 टक्क्यांची घसरण झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Axis Bank- 2.88 टक्के

  • SBI- 2.78 टक्के

  • Maruti Suzuki- 2.53 टक्के

  • Cipla- 2.42 टक्के

  • Kotak Mahindra- 1.87 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • HCL Tech- 4.09 टक्के

  • Tech Mahindr- 3.67 टक्के

  • Dr Reddys Labs- 3.33 टक्के

  • TCS- 3.20 टक्के

  • Wipro- 3.19 टक्के


फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे पडसाद


या आठवड्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी संपली. या दोन दिवसीय बैठकीत फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला. या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला. गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. आशियाई शेअर बाजारात घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचा अंदाज याआधीत वर्तवण्यात येत होता.