Bank Transaction: तुमच्या बँक (Bank) खात्यात असलेले पैसे तुम्ही कधीही काढू शकता. पण तुम्हाला तुमचे पैसे काढताना काळजी घ्यावी लागेल. पैसे काढण्याचे योग्य नियोजन करावं लागेल. नाहीतर तुम्हाला अनावश्यक कर भरावा लागेल. कर न भरता एका वर्षात किती रक्कम काढता येईल याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत. मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क भरण्याचा नियम केवळ एटीएम व्यवहारांनाच लागू नाही, तर असाच नियम बँकेतून पैसे काढण्यासाठीही लागू आहे.
किती रोख रक्कम काढता येईल
लोकांना असे वाटते की त्यांच्या बँक खात्यातून त्यांना हवे तितके पैसे विनामूल्य काढता येतात. परंतु, आयकर कायद्याच्या कलम 194N अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याला TDS भरावा लागतो. हा नियम फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांनी सलग 3 वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही. अशा लोकांना कोणत्याही बँक, सहकारी किंवा पोस्ट ऑफिसमधून 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास टीडीएस भरावा लागेल.
आयकर रिटर्न भरणाऱ्यांना दिलासा
आयटीआर भरणाऱ्यांना या नियमांतर्गत अधिक दिलासा मिळाला आहे. असे ग्राहक TDS न भरता बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँक खात्यातून एका आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपर्यंतची रोकड काढू शकतात.
किती TDS भरावा लागेल?
या नियमानुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 1 कोटींहून अधिक रक्कम काढल्यास, 2 टक्के दराने TDS कापला जाईल. जर तुम्ही गेल्या तीन वर्षांपासून सतत ITR भरला नसेल, तर तुम्हाला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढल्यावर 2 टक्के TDS आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढल्यावर 5 टक्के TDS भरावा लागेल.
ATM व्यवहारांवर आधीच शुल्क आकारले जाते
एटीएममधून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी बँका शुल्क आकारतात. RBI ने 1 जानेवारी 2022 पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी सेवा शुल्क वाढवले होते. आता बँका विहित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी 21 रुपये आकारत आहेत. यापूर्वी यासाठी 20 रुपये मोजावे लागत होते. बहुतेक बँका त्यांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहार देतात. याशिवाय इतर बँकांच्या एटीएममधूनही तीन व्यवहार मोफत आहेत. मात्र, मेट्रो शहरांमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँकेतून फक्त तीन वेळाच पैसे काढू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: