नवी दिल्ली:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं उद्योगविश्वातून कौतुक करण्यात येत असून देशातील अनेक उद्योगपतींनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून विकासाची गती कायम ठेवणारा असल्याची प्रतिक्रिया उद्योग विश्वातून येत आहे. 


देशातील काही प्रमुख उद्योगपतींनी या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे, ती खालीलप्रमाणे, 


उदय कोटक, महिंद्रा बँक


कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "विकासाचा एक योग्य आराखडा, व्हिजन असलेलं हे बजेट आहे. नागरिकांना तात्काळ फायदा देणारे असं या बजेटचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या दरडोई उत्पन्नामध्ये 1.97 लाख इतकी वाढ झाली असून त्यामुळे विकासाचा पाया रचला जात आहे. हे बजेट आपल्या नावाप्रमाणेच, अमृतकाळ बजेट आहे."


शांती एकंबरम, संचालक कोटक महिंद्रा बँक
 
अर्थमंत्र्यांनी उच्च भांडवली खर्चाच्या दुहेरी बूस्टरसह एक सकारात्मक आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे आणि आयकर कमीत कमी केला आहे, अशा प्रकारे वित्तीय तूट 5.9 टक्के आणि बाजारातील कर्जे बाजाराच्या अपेक्षांनुसार  15.43 लाख कोटी इतकी ठेवताना वाढ आणि उपभोग वाढवला आहे. या बजेटमध्ये कोणतेही नकारात्मक सरप्राईज नव्हते.


अर्थसंकल्पात कृषी, पायाभूत सुविधा भांडवली खर्च, हरित ऊर्जा, पर्यटन, युवा कौशल्य यासह भारताच्या वाढीस मदत करणार्‍या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीही तरतूद केली होती. व्यवसाय करण्याची सुलभता सुधारणे, डिजिटलायझेशन वाढवणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, नियम आणि अनुपालन सुलभ करणे आणि वित्तीय एकत्रीकरणाचा मार्ग दाखवणे यावर मुख्य लक्ष केंद्रित केले गेले. त्यामुळे भारताची आर्थिक महासत्ता बनण्याची क्षमता अजून सक्षम करेल. 


मनीष कोठारी, अध्यक्ष - कमर्शियल बँकिंग, कोटक महिंद्रा बँक


अर्थमंत्र्यांनी मांडलेला बजेट हा अष्टपैलू, विवेकपूर्ण आणि विकासाभिमूख आहे. व्यावहारिकदृष्ट्या सर्व विभागांना सकारात्मक न्याय मिळत आहे. यामध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे आणि देशांतर्गत व्यापाराला चालना दिली आहे आणि तरीही वित्तीय तूट 5.9 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले आहे, आणि हे सर्व कोणत्याही अवास्तव आकडेवारीत न अडकता केलेलं आहे. 


नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणि तरुणांना कौशल्य यामुळे व्यापक सुधारणांसह इज ऑफ डुईंग बिजनेससाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण उपाययोजना तसेच सूक्ष्म, लहान, मध्यम किंवा मोठ्या व्यवसायांना त्यांची किंमत-स्पर्धाक्षमता सुधारण्यात मदत करतील. तंत्रज्ञान, मूल्यवर्धित पीक लागवड आणि कृषी आणि संबंधित गोष्टींच्या कर्जामध्ये वाढ याद्वारे पुरवल्या जाणार्‍या मदतीमुळे ग्रामीण उत्पन्नाला चालना मिळेल. डिजिटल उपक्रमांमधून मोठ्या प्रमाणात समावेशकता तसेच कार्यक्षमता येईल. या सर्व उपायांद्वारे रोजगार निर्मिती, वैयक्तिक करात कपात करून देशांतर्गत विकासास सहाय्य होईल आणि गुंतवणुकीसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल.


मोतीलाल ओसवाल, एमडी आणि सीईओ, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस


यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी या मध्यमवर्गीय उत्पन्न गटाची उपभोग शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. हे इन्फ्रा, गृहनिर्माण, सिमेंट, कॅप गुड्स, ऑटो आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांसाठी सकारात्मक असेल. काही राज्यांच्या निवडणुका असूनही, सरकारने लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केला नाही आणि वित्तीय विवेक राखण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद आहे. 


 निश भट्ट, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मिलवूड केन इंटरनॅशनल


हा एक संतुलित अर्थसंकल्प होता ज्यात वित्तीय विवेक आणि वाढीवर स्पष्ट लक्ष केंद्रित केले होते. राजकोषीय तूट आणि सरकारी कर्ज योजनांच्या घोषणांमुळे इक्विटी, तसेच बाँड मार्केटवर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलंय. निवडणुकीच्या वर्षात जास्त खर्च करण्यापासून दूर राहण्याचा निर्णय धाडसी होता. पायाभूत सुविधांसाठी  10 लाख कोटी आणि सरकारी गृहनिर्माण योजनेसाठी  79,000 कोटी (PMAY) रुपयांची तरतूद पायाभूत प्रकल्पांना चालना देतील. 50 नवीन विमानतळ प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देतील आणि त्या प्रदेशातील रिअल इस्टेट मार्केट विकसित करतील.