Union Budget 2021: आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, शहरांचा विस्तार यावर भरीव तरदूत करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने 'आर्थिक लस' देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येईल.
भारतीय शेअर बाजारामध्ये सकाळपासूनचं जोरदार वाढ होताना दिसत आहे. अर्थसंकल्पाचं वाचन सुरू असताना शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. 818 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 47,100 वर पोहोचला आहे. स्क्रैपेज पॉलिसीची घोषणा झाल्यानंतर ऑटो शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. निफ्टीही 237 अंकांनी वधारत 13881 वर पोहोचला आहे.
अर्थसंकल्प सुरू होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये 528 अंकांची वाढ दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स 46,814 वर पोहोचला होता. याआधी, दिवसाच्या सुरवातीला रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी वधारलेला पाहायला मिळाला. असा विश्वास आहे की आज दिवसभरात शेअर बाजार तेजीत पाहायला मिळेल.
या आहेत अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतूदी...
कोरोना काळात सरकारने गरजूंना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला. कोरोना काळात पाच मिनी बजेट सादर केले. कोरोना काळात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.
आरबीआयने 27 लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. आत्मनिर्भर भारतासाठी जी़डीपीच्या 13 टक्के पॅकेज दिले असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अनेक सुधारणांना वाव मिळाला.
आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद
आरोग्य़ क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी ती 94 हजार कोटी इतकी होती. त्या शिवाय नवीन आरोग्य योजनांसाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य केन्द्राच्या पायाभूत सोयींसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. देशात 15 नवे आरोग्य केंद्र आणि 2 मोबाईल हॉस्पिटल्स घोषणाही करण्यात आली आहे. त्याचसोबत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात इन्टिग्रेटेड लॅब स्थापण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातल्या 112 जिल्ह्यात मिशन पोषण योजना राबवणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आजारांना आळा घालण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचंही सांगण्यात आलंय.
देशातील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी कोरोनाचे लसीकरण सुरु आहे. त्या कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.