Pm Narendra Modi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 2022 चा अर्थसंकल्प देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाईल', असे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील गरीबांची ताकद कोणालाच समजली नाही. राजकीय मतपेटीसाठी त्यांचा उपयोग झाला. परंतु, केंद्र सरकारच्या जनधन आणि पंतप्रधान आवाससारख्या योजनांमुळे गरीबांचा आत्मविश्वास वाढला आहे. केंद्र सरकार देत असलेल्या घरात हे गरीब लोक लखपती होतील. जवळपास तीन कोटी लोकांना पक्के घर देऊन लखपती बनवले आहे. यातील जास्तीत-जास्त घरांची मालकी महिलांकडे आहे. 


"देशभरातील महिलांना आणि शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. परंतु, केंद्र सरकारने ग्रामीण भागातील 9 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून वर्षभरात ग्रामीण भागातील चार कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. 5G तंत्रज्ञानासाठीही प्रयत्न सुरू असून लवकरच 5G सुरू होईल. 5G तंत्रज्ञान नव्या युगाची सुरुवात करेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.   
  
"देश सध्या सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोनाच्या या काळात जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. परंतु, कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगभरातील लोकांना भारताला अधिक मजबूत रूपात पाहायचे आहे. त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे नव्याने पाहात आहे. त्यावेळी आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेणे आवश्यक आहे. नवीन संधी आणि नवीन संकल्प पूर्ण करण्याची ही वेळ आली असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. 


पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले, "2013-14 मध्ये भारताची निर्यात दोन लाख 85 हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात चार लाख 70 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या या काळातही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे  या अर्थसंकल्पाचा फोकस गरीब आणि तरुणांवर आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे" 


अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी देण्यात आलेल्या कर सवलती तरुणांना नवे काहीतरी निर्माण करण्यासाठी प्रेरित करतील. याबरोबरच यंदाच्या अर्थसंकल्पात खेळांना जास्त महत्त्व देण्यात आले आहे. खेळासाठी निधीमध्ये अर्थसंकल्पात गेल्या काही वर्षांत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. याचा तरुणांना फायदा होईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, "MSP (हमीभाव) बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. परंतु, या हंगामात  हमीभाव म्हणून पिकांसाठी शेतकर्‍यांना दीड लाख कोटींहून अधिक रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. याबरोबरच यंदाच्या  अर्थसंकल्पात  गंगा नदीच्या काठावर 2 हजार 500 किमी लांबीच्या नैसर्गिक शेती कॉरिडॉरची संकल्पना मांडण्यात आली आहे."  


महत्वाच्या बातम्या


OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षण: राज्य निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष


अटकेत असलेल्या 'हिंदुस्थानी भाऊ'च्या नावाने आणखी एक मेसेज व्हायरल, वकील म्हणतात...