Budget 2022 Share Market :  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या  अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या. या घोषणांचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला आहे. त्याशिवाय, पंतप्रधान आवास योजना, नल-जल योजना, डिजिटल करन्सी, क्रिप्टोकरन्सीवर कर आदी घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाकडे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे लक्ष होते. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे काही शेअरर्सच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 


या क्षेत्रांवर ठेवा नजर 


अर्थसंकल्पात इलेक्ट्रीक वाहनांच्या संबंधित बाबींवर भर देण्यात आला. त्याशिवाय पायाभूत सुविधा, वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या वाढवण्याची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय सौर ऊर्जेसाठी पीएलआय योजना, पीएम आवास योजनेतंर्गत 80 लाख घरे, 5 जीची सुरुवात, संरक्षण क्षेत्रावर आणि डिजिटल इकॉनॉमीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. 


'या' स्टॉक्समध्ये होऊ शकते भरभराट 


EV सेक्टर : इलेक्ट्रीक वाहनांसाठी अर्थसंकल्पात धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बॅटरींची अदलाबदल करण्याच्या धोरणाबाबत घोषणा करण्यात आली. यामुळे वाहनांची बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्यांचे शेअर वधारू शकतात. Exide Industries आणि  Amara Raja Batteris च्या शेअरवर गुंतवणुकदारांची नजर असणार आहे. 


पायाभूत सुविधा आणि परिवहन:  ग्रामीण, दुर्गम भागात रस्त्यांची निर्मिती करणे, शहरांमध्ये मेट्रोच्या जाळं विस्तारण्याची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय तीन वर्षात 400 वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आली. यामुळे पायाभूत सुविधा आणि परिवहन क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर नजर असणार आहे. L&T, GMR Infra, Container Corporation आणि IRCTC या स्टॉक्समध्ये खरेदी दिसू शकते.


धातू आणि सौर ऊर्जा:  सरकारने चार कोटी घरांना पिण्याचे पाणी नळाद्वारे देण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. त्याशिवाय लॉजिस्टिक्समध्ये सरकारचे विशेष लक्ष आहे. सौर ऊर्जा क्षेत्रासाठी जवळपास 20 हजार कोटींच्या पीएलआय योजनेची घोषणा करण्यात आली आहे.  Tata Steel, Vedanta, JSW Steels, Kirloskar Brothers, Tata Power, Adani Enterprises, Reliance Industries सारख्या कंपन्यांचे स्टॉक्समध्ये गुंतवणुकदारांचा ओढा वाढू शकतो. 


टेलिकॉम : 5 जी सेवेची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या वर्षी स्पेक्ट्रमचा लीलाव करण्यात येणार आहे. सरकार देशामध्ये डेटा स्टोरेजसाठीदेखील प्रोत्साहन देऊ शकते. या निर्णयामुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्टॉक वधारू शकतात. 


संरक्षण:  संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. देशामध्ये लष्करी उपकरणांचे उत्पादन वाढवण्यावर जोर देण्यात येत आहे. अर्थमंत्र्यांनी 68 टक्के डिफेन्स कॅपेक्स स्थानिक कंपन्यांसाठी नियोजित आहे. या घोषणेमुळे Bharat Forge, Paras Defence, New Space India आदी कंपन्यांचे शेअर वधारू शकतात.


(DISCLAIMER: ही बातमी शेअरच्या खरेदीसाठी अथवा विक्रीसाठी सल्ला देणारी नसून केवळ माहिती आणि विश्लेषणासाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने अथवा वैयक्तिक जबाबदारीवर करावी. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असू शकते, बातमीत उल्लेख केलेले शेअर्स खरेदी करण्याचं आवाहन आम्ही करत नाहीत.)