Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उद्योगजगतापासून ते नोकरदार वर्गाच्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. येत्या अर्थसंकल्पात करदात्या नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयकर कायद्यानुसार मिळणाऱ्या कर वजावटीसाठी (Tax Deduction) असणाऱ्या कलम 80 C बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कर वजावटीसाठीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 


आयकर कायद्यानुसार मिळणाऱ्या कर वजावटीसाठी (Tax Deduction) असणारा फायदा घेण्यासाठी अनेक करदाते सेक्शन 80C चा वापर करतात. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये Tax Deductionची मर्यादा ही एक लाख रुपये प्रति वर्ष इतकी होती. त्यानंतर ही मर्यादा आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये दीड लाख रुपये प्रति वर्ष इतकी करण्यात आली. त्यानंतर जवळपास सात वर्षांपासून यामध्ये कोणताही बदल झाला नाही. अनेकांचे वेतन आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. मात्र, अनुषंगाने सेक्शन 80C नुसार मिळणाऱ्या लाभात वाढ झाली नाही. 


80Cचा फायदा काय?


तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा करू शकता. याचा लाभ वैयक्तिक करदात्यांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (HUFs) आहे. कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळवण्यासाठी गुंतवणूक करू शकणारे काही पर्याय खालीलप्रमाणे आहेत : 


> जीवन विमा प्रीमियम
> ELSS
> EPF, VPF
> एलआयसीच्या वार्षिक योजना
> NPS मध्ये गुंतवणूक 
> पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममधील गुंतवणूक 
> कर बचत मुदत ठेव
> सुकन्या समृद्धी योजना
> युलिप
> नाबार्ड बाँड
> गृहकर्जाच्या मूळ रकमेची परतफेड
> मुलांचे शैक्षणिक शुल्क


80C मर्यादा का वाढवावी? 


कोरोना महासाथीचा आजार आणि वाढती महागाई लक्षात घेऊन सरकारने कलम 80C ची मर्यादा वाढवावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही मागणी प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी केली जाते. या कलमाची मर्यादा वाढवून अडीच लाख रुपये प्रतिवर्ष करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. कलम 80C च्या वजावट मर्यादेत कोणतीही वाढ किंवा घट याचा थेट परिणाम करपात्र उत्पन्नावर होतो.