Budget 2020 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नव्या कर रचनेची घोषणा करण्यात आली. आता 5 लाखांपासून 7.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के कर द्यावा लागणार आहे. तर अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. याशिवाय अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर द्यावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) सादर केला. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
5 ते 7.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के कर द्यावा लागेल. 7.5 ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना 20 टक्क्यांऐवजी 15 टक्के दराने कर द्यावा लागेल. 10 ते 12.5 लाख रुपयांपर्यंत मिळकत असलेल्या करदात्यांचा कर 30 टक्क्यांवरुन कमी करुन 20 टक्क्यांवर आणला आहे. 12.5 ते 15 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 25 टक्के दराने कर द्यावा लागेल.
नवीन कर रचना
उत्पन्न नवा टॅक्स जुना टॅक्स
0-2.5 लाख करमुक्त करमुक्त
2.5 ते 5 लाख 5% 5%
5-7.5 लाख 10% 20%
7.5-10 लाख 15% 20%
10-12.5 लाख 20% 30%
12.5-15 लाख 25% 30%
15 लाखांवर 30% 30%
अशाप्रकारे तुम्हाला करावर मोठी बचत होणार आहे. अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. तर अडीच ते पाच लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर द्यावा लागणार आहे.
5 ते 7.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आधी 50 हजार रुपये कर द्यावा लागत होता, मात्र आता त्यांना 25 हजार रुपये कर द्यावा लागणार आहे.
10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना एक लाख रुपयांपर्यंत कर द्यावा लागत असे, मात्र नव्या कर रचनेनुसार तो कमी होऊन 62 हजार 500 रुपये होईल.
12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1.75 लाख रुपये टॅक्स द्यावा लागत होता, ज्यात घट होऊन 1 लाख 12 हजार 500 रुपये होईल.
15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणारे जे करदाते 2.5 लाख रुपये कर भरत होते, त्यांना आता 1.75 लाख रुपये कर द्यावा लागणार आहे.
नवी कररचना सोपी पण...
करदात्यांना कर आकारणीसाठी नवीन आणि जुने टॅक्स स्लॅब निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. ज्यांना जुन्या रचनेप्रमाणे कर आकारणी करायची आहे, त्यांना जुन्या करवजावटी आणि सवलती मिळतील. तर ज्यांना नव्या रचनेप्रमाणे कर आकारणी करायची असेल त्यांना करवजावटी आणि सवलती मिळणार नाहीत. कारण नव्या कररचनेत 70 प्रकारच्या करवजावटीच्या तरतुदी काढण्यात आल्या आहेत. या 70 प्रकारच्या करवजावटीच्या तरतुदी कोणत्या याविषयी अद्याप स्पष्टता नाही.