Defence Stock: येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच कारणामुळे या अर्थसंकल्पात काय विशेष असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचेही यावेळच्या अर्थसंकल्पावर लक्ष आहे. निर्मला सीतारामना कोणत्या क्षेत्रासाठी किती रुपयांची तरतूद करतात? कोणत्या क्षेत्रासाठी नेमके काय धोरण राबवले जाते? असे विचारले जात आहे. दरम्यान, यावेळी केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील चांगले रिटर्न्स देणारे शेअर कोणते आहेत? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोण-कोणत्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे? यावर एक नजर टाकूया...
अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्रेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 6.21 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 4.3 टक्क्यांनी अधिक आहे. अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आलेला निधी हा एकूण निधीच्या 13.04 टक्के होता. तज्ज्ञांच्या मते अंतरिम अर्थसंकल्पाचाच विस्तार यावेळच्या अर्थसंकल्पात केला जाईल.
डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
जेव्हा-जेव्हा अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जवळ येते तेव्हा-तेव्हा शेअर बाजारात मोठ्या हालचाली होतात. यावेळीदेखील गेल्या एका महिन्यात शेअर बाजारात साधारण 56 टक्क्यांची तेजी झाली आहे. संरक्षण क्षेत्रातील GRSE आणि मझगांव डॉक या दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये क्रमश: 60 आणि 43 टक्क्यांनी तेजी मिळाली आहे. पारस डिफेन्स या शेअरमध्ये एका महिन्यात 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोचिन शिपयार्ड या कंपनीनेदेखील चांगले रिटर्न्स दिले आहेत.
हे शेअर करू शकता खरेदी
इकनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज फर्म शेरखानने संरक्षण क्षेत्रातील काही स्टॉक्स गुंतवणुकीसाठी सुचवले आहेत. यामध्ये एचएएल, बीईएल, भारत फोर्ज या शेअर्सच नाव आहे. यासह एचएएल, बीईएमएल, बीईएल, एमडीएल, बीडीएल, जीआरएसई, डाटा पॅटर्न, कोचिन शिपयार्ड आदी कंपन्यांच्यांवरही लक्ष ठेवायला हवे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
सरकारची 'ही' महारत्न कंपनी देणार तगडे रिटर्न्स, गुंतवणूक केल्यास होणार जबरदस्त फायदा?
अर्थसंकल्पानंतर 'हे' आठ स्टॉक होणार रॉकेट? जाणून तगड्या शेअर्सची यादी!