Budget 2023 :  उद्या, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज, निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यानंतर बाजारात किंचीत तेजी दिसून आली. त्यानंतर आता, शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवशी नेमकं (Share Market On Budget Day) कसं वातावरण असणार, याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे. मागील 12-13 वर्षांचा ट्रेंड लक्षात घेता, गुंतवणूकदारांना शेअर बाजारात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात काही सकारात्मक बाबी समोर आल्याने बाजारात तेजी दिसून आली. 


अर्थसंकल्पाच्या दिवशी मागील 13 वर्षातील ट्रेंड काय? (Share Market Trend On Budget Day)


> 2022: गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 848 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्स 58,862.57 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,577 वर बंद झाला होता. 


> 2021: 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 5 टक्क्यांनी वधारला होता.


> 2020: अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 2.43 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टीही हाच ट्रेंड दिसला होता.


> 2019: अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 0.59 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.


> 2018: 1 फेब्रुवारी 2018 रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्या दिवशी सेन्सेक्समध्ये 0.16 टक्क्यांची घसरण झाली होती.


> 2017: 1 फेब्रुवारी रोजी, अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 1.76 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. वर्ष 2010 ते 2019 मधील ही सर्वाधिक वाढ होती.


> 2016: अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स 0.66 टक्क्यांनी घसरला.


> 2015: अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारी 2015 रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्या दिवशी सेन्सेक्स 0.48 टक्क्यांनी वधारला होता. मोदी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प होता.


> 2014: तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्या दिवशी सेन्सेक्स 0.28 टक्क्यांनी घसरला.


> 2013: 28 फेब्रुवारी 2013 रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 1.52 टक्क्यांनी घसरला होता. 


> 2012: 16 मार्च 2012 रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 1.19 टक्क्यांनी घसरला.


> 2011: 28 फेब्रुवारी 2011 रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 0.69 टक्क्यांनी वधारला.


> 2010: 26 फेब्रुवारी 2010 रोजी, अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 1.08 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.


अर्थसंकल्पाच्या दिवशी तुमची स्ट्रॅटेजी काय असावी?


Master Capital Services Limited चे वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंदर सिंह नंदा यांनी सांगितले की यंदाच्या अर्थसंकल्पावर करदाते आणि गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असणार आहे. मागील काही अर्थसंकल्पीय दिवसांच्या व्यवहारावर नजर टाकल्यास निफ्टी -5.84% ते +4.74% या दरम्यान व्यवहार करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 


अर्थसंकल्प गुंतवणूकदारांना सवलतीच्या दरात काही मूलभूतपणे चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारकडून अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, त्यामुळे गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेऊन गुंतवणूक करावी असा सल्ला नंदा यांनी दिला. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या पाहिजेत. अर्थसंकल्पाच्या पहिल्या सहामाहीत बाजार दोन्ही दिशेने ट्रेंड करत असतो, असेही त्यांनी सांगितले. 


(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. यातून कोणताही गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)