मुंबई : किरीट सोमय्यांनी ( kirit somaiya) आरोप केलेलं कार्यालय माझं नसून ते वांद्र्यातील सोसायटीचं आहे, आणि त्याचा लेखी पुरावा म्हाडाने दिला आहे, हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल असं शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab ) यांनी म्हटलंय. ज्या अधिकाऱ्याने कोणतीही शाहनिशा न करता नोटीस पाठवली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अनिल परब म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी तब्बल तीन तास चर्चा केली. 


वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर अनिल परब यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. 


"कारवाई झालेल्या जागेचा, कार्यालयचा आणि माझा काही देखील संबंध नाही असा लेखी पुरावा म्हाडाने मला दिला आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून किरीट सोमय्या हे खोटं बोलत आहेत. त्यांच्यावर मी मानहानीचा दावा देखील दाखल केलाय. त्यातच आता म्हाडाने तर ते खोटं बोलत असल्याचा पुरावाच दिला आहे. परंतु किरीट सोमय्या हे फक्त मला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असे खोटे आरोप करत आहेत. म्हाडाने दिलेल्या लेखी पुराव्यामुळे ते तोंडावर आपटले आहेत, असे अनिल परब यांनी यावेळी म्हटले आहे.


"मुळ प्लॅनच्या बाहेर जे बांधकाम केलं जातं त्याला अनधिकृत बांधकाम म्हटलं जातं. त्यामुळे मी म्हाडाकडे मुळ बांधकामाच्या नकाशाची कॉपी मागितली आहे. परंतु, ही कॉपीच म्हाडाकडे नाही. त्यामळे हे अनधिकृत बांधकाम कसं हा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर म्हाडाने यावर तपास करून उत्तर देऊ असं म्हटललं आहे. आठ दिवसात ही कॉपी देऊ असं देखील म्हाडाने सांगितलं आहे. म्हाडाने जर आठ दिवसात मुळ नकाशाची कॉपी दिली नाही तर मी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करेन, कोर्टात जाईन, असा इशारा अनिल परब यांनी दिलाय. याबरोबरच कोणतीही शहानिशा न करता ज्या अधिकाऱ्याने मला नोटीस पाठवली त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी अनिल परब यांनी केली आहे. 


किरीट सोमय्या यांना या सर्व गोष्टींचा जाब विचारणार आहे. शिवाय गरीबांची घरं पाडण्याच्या सोमय्या यांच्या षडयंत्राला भाजपचा पाठिंबा आहे का? असा प्रश यावेळी अनिल परब यांनी उपस्थित केला. भाजपने याबबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अनिल परब यांनी यावेळी केली आहे.