Rakesh Jhunjhunwala : मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे (Rakesh Jhunjhunwala Passed Away) आज सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या अकासा एअर या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


राकेश झुनझुनवाला यांनी ऐंशीच्या दशकात वडिलांच्या मार्गदर्शनानंतर शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. झुनझुनवाला यांच्या वडिलांनी त्यांना कोणतीही आर्थिक मदत केली नाही. त्यावेळी अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. त्यामुळेमध्यमवर्गीय गुंतवणूकदार वर्गामध्ये राकेश झुनझुनवाला हे लोकप्रिय होते. राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. जुलै 2022 अखेरीस त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी होते. 






काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या 'अकासा एअर' या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. राकेश झुनझुनवाला हे मागील काही वर्षांपासून आजारी होते. प्रकृती खालावल्याने झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे. 


राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी होती.  झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते. 'स्टार हेल्थ'मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.