मुंबई : माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Death) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच बॉलिवूडमध्ये मोठं वजन असलेल्या या नेत्याची ऐन दसऱ्याच्या दिवशीच हत्या केल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, दिग्दर्शकांशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दिकी हे कोट्यधीश होते. त्यांच्याकडे महागड्या गाड्या होत्या.
तिघांनी गोळ्या झाडल्या
बाबा सिद्दिकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ऐन दसऱ्याच्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. या हत्या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. हे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यामध्ये एका भाड्याच्या खोलीत होते. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची सुपारी घेतली होती. या हत्याप्रकरणात आणखी एका आरोपीचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा चौथा आरोपी गोळीबार करणाऱ्या तिघांना मार्गदर्शन करत होता, असा पोलिसांना सशंय आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे नेमके कारण काय?
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे एसआरए प्रकल्पाचा वाद आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचा संबंध अभिनेता सलमान खानची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या बिश्नोई गँगशी होता, असे समोर आले. त्यामुळे या हत्येमागे बिश्नोई गँग आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन द्या दृष्टीने तपास करत आहेत.
बाब सिद्दिकी यांची एकूण संपत्ती किती?
बाबा सिद्दिकी हे इयत्ता 12 वी पर्यंत शिकले होते. 2014 सालच्या निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रानुसार बाबा सिद्दिकी हे एकूण 76 कोटी रुपयांचे मालक होते. बाबा सिद्दिकी यांच्याकडे महागडे दागिने, महागड्या गाड्या होत्या. दागिने आणि गाड्यांची जवळपास किंमत 30 कोटी रुपये होते. त्यांच्याकडे मर्सिडिज बेझ कार होती, सोन्याचे आणि हिऱ्याचे अनेक दागिने होते. 2009 सालच्या निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार 2009 साली त्यांची संपत्ती 25 कोटी रुपये होती.
पाहा व्हिडीओ :
निवडणुकीतील शपथपत्रानुसार बाबा सिद्दिकी आणि त्यांच्या पत्नीकडे 2014 साली एकूण 6 कोटी रुपयांचे दागिने होते. बाबा सिद्दिकी यांच्या नावावर 2014 साली 4 कोटी रुपयांची एक व्यावसायिक इमारत होती. तर त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण दोन व्यावसायिक इमारती आहेत. यातील एका इमारतीची किंमत 1 कोटी तर दुसऱ्या इमारतीची किंमत 91 लाख रुपये आहे. बाबा सिद्दिकी यांच्यानावे वांद्रे येथे 3 आणि 15 कोटी रुपयांच्या आणखी दोन व्यावसायिक इमारती होत्या.
हेही वाचा :
मोठी बातमी! बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर
तिघं आले, गोळ्या झाडल्या, पण सिद्दिकींच्या हत्येमागचा खरा नराधम वेगळाच? चौथा मास्टरमाईंड नेमका कोण?
रिक्षाने आले, वाट पाहिली, अन् थेट फायरिंग; बाबा सिद्दिकींवरील गोळीबाराचा कट नेमका कसा शिजला?