मुंबई : माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. 12 ऑक्टोबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. या हत्याप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध चालू आहे. याच हत्येत आणखी एक आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आरोपींनी गोळीबार कसा केला? हत्येसाठी आरोपींनी नेमका काय कट रचला होता? हे आता समोर येत आहे.
दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हत्या प्रकरणातील पहिला आरोपी हा करनैल सिंह असून तो मुळचा हरियाणाचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचेे नाव धर्मराज कश्यप असे असून तो मुळचा उत्तर प्रदेश राज्याती आहे. सध्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
रिक्षाने घटनास्थळी आले
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कट शिजत होता. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. तसेच तीनही आरोपी बाबा सिद्धिकी बाहेर येण्याची वाट पाहात होते.
आणखी एक आरोपी करत होता मार्गदर्शन
या तीन आरोपींना आणखी एक आरोपी मार्गदर्शन करत असावा, असा पोलिसांना संशय आहे.पण तो नेमका कोण आहे? याबाबत पोलिसांना स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही. हे आरोपी मागील अनेक दिवसांपासून बाबा सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेवत होते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या गोळ्या
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. तर डॉक्टरांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार बाब सिद्दिकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ते शुद्धीवर नव्हते. त्यांचे शरीरा कोणतीही हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र सिद्दिकी यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या छातीला गोळ्या लागल्या होत्या. नियमानुसार बाबा सिद्दिकी यांच्या मृतदेहाची उत्तरीय चाचणी केली जाणार आहे.
हेही वाचा :
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच