Changes From 1 January : सध्या सुरू असलेल्या 2021 या वर्षाचा उद्या शेवटचा दिवस आहे. या वर्षाला निरोप देण्याची तयारी तुम्ही केली असेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियोजनही केले असेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अर्थात एक जानेवारीपासून आर्थिक बाबतीत काही नियम बदलणा आहेत. या नव्या बदलामुळे काही प्रमाणात खिशाला झळ बसणार आहे. जाणून घ्या काय होणार आहेत बदल...
ATM मधून पैसे काढणे महागणार
ग्राहकांनी जर आता ATM व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना 1 जानेवारी 2022 पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2021 च्या आदेशाप्रमाणे, 1 जानेवारी 2022 पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना एटीएम व्यवहारांवर प्रति व्यवहार 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय जीएसटी वेगळा असणार आहे. सध्या 20 रुपये आकारण्यात येतात.
10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास शुल्क
India Post Payment Bank मध्ये 10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास तुम्हाला शुल्क द्यावे लागणार आहे. सेव्हिंग आणि करंट अकाउंटवर ही शुल्क आकारणी होणार आहे. इंडिया पोस्ट बँकेत तीन प्रकारचे बचत खाती उघडले जातात. यामध्ये बेसिक सेव्हिंग अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटसाठी वेगवेगळे नियम आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शुल्क नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील आणि बँकिंगच्या इतर नियमांनुसार त्यावर GST/सेस आकारण्यात येणार आहे.
KYC नसलेले डीमॅट अकाउंट निष्क्रिय होणार
31 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचे डिमॅट खात्याचे KYC केले नसल्यास तुमचे खाते एक जानेवारीपासून निष्क्रिय (Deactivate) होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे या कामासाठी काही तासच आहेत.
आरक्षणाशिवाय रेल्वे प्रवास
भारतीय रेल्वे एक जानेवारीपासून मोठा बदल करणार आहे. काही रेल्वे मार्गांवर एक जानेवारीपासून अनारक्षित तिकिटावर रेल्वे प्रवास करता येणार आहे.
कपडे आणि शूज खरेदीवर जीएसटी
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, शूजसाठी असलेल्या जीएसटी दरात वाढ केली आहे. याआधी हा दर पाच टक्के होता. आता हा जीएसटी 12 टक्के होणार आहे. नवीन जीएसटी दर एक जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. काही सिंथेटिक फायबर आणि धाग्यांसाठी असलेला जीएसटी कर हा 18 टक्क्यांहून 12 टक्के करण्यात आला आहे.