Share Market And Election Result : देशातील निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. आज 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी समजली जात आहे. याआधी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला होता. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले होते. त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...
उत्तर प्रदेश सन २०१७ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा समाजवादी पक्ष सत्तेवर होता. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली होती. तर, एक महिन्यानंतर सरासरी 3.4 टक्क्यांनी वाढ झाली.
गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकांचे अनेकांचे लक्ष होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर ही निवडणूक झाली होती. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. भाजपने आपली सत्ता कायम राखली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये १ टक्के वाढ झाली होती. तर, महिनाभरानंतर निफ्टी 4 टक्क्यांनी वधारला होता.
सन २०१८ मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच जागांचे अंतर राहिले होते. निवडणूक निकालानंतर भाजप सत्तेतून पायउतार झाली आणि काँग्रेसने सत्ता हाती घेतली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये 1.8 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर महिनाभरात 2.3 टक्क्यांनी निफ्टी वधारला. राजस्थान विधानसभेची निवडणूक २०१८मध्ये पार पडली. भाजपला पराभूत करत काँग्रेसने सत्ता मिळवली. निकाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत 1.8 टक्क्यांनी वाढ झाली. तर, एका महिन्यात 2.3 टक्क्यांनी वाढ झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सन २०१९ मध्ये पार पडली होती. निवडणुकांच्या दिवशी भाजप आणि शिवसेना सत्तेवर होती. निकालानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या आणि भाजप सत्तेतून पायउतार झाला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टी 1 टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर निफ्टीत एक टक्क्यांनी वाढ झाली.
सन 2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने सत्ता कायम ठेवली. सन 2015 झालेल्या निवडणुकीत राजद आणि जनता दल युनायटेड यांनी सत्ता स्थापन केली होती. मात्र, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सन 2020 च्या निवडणुकीत भाजप-जनता दल युनायटेडने सत्ता कायम ठेवली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत एक टक्क्यांनी वाढ झाली होती. एक महिन्यानंतर निफ्टी 6.7 टक्क्यांनी वधारला होता. मागील वर्षी पश्चिम बंगालची निवडणूक पार पडली होती. तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत बदल झाला नाही. तर, एक महिन्यानंतर सरासरी 6.5 टक्क्यांनी निफ्टी वधारला होता.
शेअर बाजारावर निवडणूक निकालांप्रमाणे इतर घटकही परिणाम करत असतात. यामध्ये देशातंर्गत राजकीय परिस्थिती, सरकारचे धोरण, जागतिक पातळीवर होणारे बदल आदी घटकांचाही समावेश असतो.