Apple Business Growth in India : Apple कंपनीने भारतात (India) मोठा विक्रम केला आहे. गेल्या 50 वर्षात कोणतीही कंपनी करु न शकलेला विक्रम या कंपनीनं केला आहे. या कंपनीचा विक्रम हा उत्पादन आणि निर्यातीबाबत (production and export) आहे. ज्यामुळं कंपनीची उलाढाल 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरात ॲपलच्या व्यवसायात दुप्पट वाढ
Apple कंपनी जेव्हा भारतात आली, तेव्हा काही वर्षांत जगातील सर्वात मोठी कंपनी उत्पादन आणि निर्यातीच्या बाबतीत 50 वर्षांचा विक्रम मोडेल, असं कोणालाही वाटलं नाही. मात्र हे आता घडलं आहे. वित्तीय वर्ष 2024 मध्ये भारतात Apple च्या उत्पादन आणि निर्यातीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या कंपनीची उलाढाल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या 50 वर्षांतील हा मोठा विक्रम आहे. विशेष म्हणजे ॲपलच्या व्यवसायात गेल्या वर्षभरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
कंपनीने भारतात उत्पादन वाढवलं
दोन वर्षांपूर्वी, चीनमधील कोविड परिस्थितीमुळे ॲपलने आपले धोरण बदलले आणि भारतात प्रवेश केला. त्यानंतर कंपनीने येथे उत्पादन वाढवले. आता भारत ही केवळ ॲपलसाठी मोठी बाजारपेठ बनलेली नाही, तर पुरवठा करणारं एक आघाडीचं केंद्र बनलं आहे. आयफोन आणि ॲपलची इतर उत्पादने भारतातून जगातील अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मागील काही वर्षापासून आयफोनच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
50 वर्षांचा विक्रम मोडला
अॅपल आणि फॉक्सकॉन भारतात सतत त्यांच्या उत्पादन युनिट्सचा विस्तार करत आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भारत सरकारची पीएलआय योजनाही यामध्ये खूप उपयुक्त ठरली आहे. ॲपलच्या भारतातील कामकाजात आर्थिक वर्ष 24 मध्ये 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्याची किंमत 2023 च्या आर्थिक वर्षात 1.15 लाख कोटी रुपये होती. आयफोन उत्पादन आणि मॅकबुक, आयमॅक, आयपॅड, वॉच आणि एअरपॉड्सच्या देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्यामुळे ही वाढ दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या 50 वर्षात भारतातील सर्व कंपन्यांमध्ये उत्पादन आणि निर्यातीत सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे.
अॅपलच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा किती?
अॅपलच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 14 टक्के आहे. ज्याने कंपनीच्या जागतिक निर्यातीसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. तर 2023 मध्ये कंपनीचा हिस्सा केवळ 7 टक्के होता. अधिकृत आकडेवारीवर आधारित गणना दर्शविते की निर्यातीच्या आकडेवारीवर आयफोनचे वर्चस्व आहे. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 1.35 लाख कोटी रुपयांची उपकरणे परदेशात पाठवली गेली. गणनेनुसार, Apple 2024 आर्थिक वर्षात त्यांची उत्पादने देशांतर्गत विकून अंदाजे 68,000 कोटी रुपये कमावतील. याउलट, आर्थिक वर्ष 2023 मध्ये निर्यात केलेल्या iPhones चे मूल्य 66,000 कोटी रुपये होते.
महत्वाच्या बातम्या:
खुशखबर! आयफोन झाले स्वस्त, जाणून घ्या प्रो, मॅक्स मॉडेल्सची नवी किंमत काय?