Crime News : प्रेम खुललं, एकमेकांसोबत आणाभाका घेतल्या, पण खटके उडाले आणि एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं. वाचून अंगावर काटा आला असेल ना? ही एका वाक्यात सांगितलेली कहाणी आहे, छत्तीसगढमधल्या (Chhattisgarh) एका जोडप्याची. हत्येचा कट ऐकून खुद्द पोलिसही हैराण झाले आहेत. बऱ्याच दिवसांपासून एक व्यक्ती आपल्या प्रेयसिसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. पण एक दिवस अचानक त्यानं आपल्या प्रेयसिची गळा आवळून हत्या केली. कधीकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, तिला या नराधमानं कायमचं संपवलं. प्रेमासारखं निखळ भावनांचं नातं या नराधमाच्या क्रूर कृत्यामुळे रक्तानं माखलं. 


एका प्रियकरानं गळा आवळून आपल्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसिला संपवलं. तिच्या मृतदेहाचं आता करायचं काय? असा प्रश्न पडलेला असतानाच, हा नराधम तब्बल 250 किलोमीटर दूरपर्यंत तिचा मृतदेह घेऊन गेला आणि तिथेच त्यानं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण तुम्हाला वाटेल या क्रूर कर्मा प्रियकराची कहाणी इथेच संपेल. पण प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर या नराधमानं स्वतः नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. 


रक्तानं माखलेल्या नात्याच्या भयावह शेवट 


प्रेयसीला मारलं एकीकडे आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली भलतीकडेच. हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे संपूर्ण छत्तीसगढ हादरलं आहे. 38 वर्षीय महिला सरकारी शाळेत शिक्षिका होती. तिचा मृतदेह ती राहत असलेल्या ठिकाणाहून तब्बल 250 किलोमीटर लांब सापडला. महत्त्वाची बाब म्हणजे, तिला जीवे मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून ती ज्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती, तो प्रियकरच होता. ज्यानं आधी प्रेयसीला यमसदनी धाडलं, त्यानंतर स्वतः मृत्यूला कवटाळलं. दरम्यान, या रक्तरंजित कहाणी 8 ऑगस्टपासून सुरू झाली. 


मुलगी बेपत्ता असल्यामुळे महिलेच्या आईची पोलिसांत धाव 


छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यातील दशरंगपूर पोलीस चौकी परिसरात राहणाऱ्या सावित्री विश्वकर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार घेऊन पोहोचले आणि सांगितलं की, त्यांची मुलगी सपना विश्वकर्मा 27 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. अद्याप तिचा मागमूसही नाही. सपना बाघमुडा सरकारी शाळेत शिक्षिका होती. महिलेची तक्रार गांभीर्यानं घेत पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हलवली. 


मोबाईलमुळे गुपित उघड 


आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आणि सपनाचे कॉल डिटेल्स काढले. तसेच, तिच्या फोनचे लोकेशन्सही तपासण्यात आले. ज्यावरून सपनानं बेमेत्रा जिल्ह्यातील लोलेसरामध्ये 1 ऑगस्टपर्यंत महिनाभर मुक्काम केल्याचं समोर आलं. पोलिसांनी ते लोकेशन ट्रेस केलं. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी सपनाचं लोकेशन समोर येत होतं, ते लोलेसरा येथील रघुनाथ साहू यांचं घर होतं. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केलं.


रघुनाथ साहूची चौकशी केल्यावर पोलिसांना कळलं की, त्यानं त्याचं घर 43 वर्षीय राम आशिष उपाध्याय यांना भाड्यानं दिलं होतं, ज्यांच्यासोबत सपनाचे संबंध होते. जिल्ह्याच्या एएसपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ साहू यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, आशिष आणि सपना त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून एकत्र राहत होते आणि त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत.


घरमालक रघुनाथ यांनी पोलिसांना सांगितलं की, 2 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांना थोड्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात राहणाऱ्या आशिष उपाध्यायनं फोन केला होता. आशिषनं त्यांना त्याच्या घरी येण्यास सांगितलं. रघुनाथ जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळी आशिषनं वादातून सपनाचा गळा आवळून खून केल्याचं आणि मृतदेह लपवण्यासाठी त्याची मदत मागितल्याचं सांगितलं. 


भिलाई येथून स्कॉर्पिओ कार आणलेली 


त्याचं बोलणं ऐकून रघुनाथ यांना धक्काच बसला. ते घाबरला. त्यांना आपण या प्रकरणात अडकू अशी भीती वाटली. त्यामुळे मी आशिषला मदत करण्याचं मान्य केलं. त्यानंतर आशिषनं रघुनाथ साहूला सोबत घेऊन दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरातील त्याच्या वडिलोपार्जित घरी नेलं आणि तिथून त्याची एसयूव्ही, स्कॉर्पिओ लोलेसरा येथे आणली.


सपनाचा मृतदेह केशकाल दरीत फेकला


यानंतर दोघांनी मिळून सपनाचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि नंतर तो कारमध्ये टाकला आणि बेमेटारापासून 250 किमी अंतरावर असलेल्या रायपूर-जगदलपूर रस्त्यावरील केशकल दरीत नेला आणि सपनाचा मृतदेह त्या दरीत फेकून दिला. यानंतर दोघेही तिथून निघून गेले.


नदीत सापडला मृतदेह 


दरम्यान, रविवारी बेमेटारा येथील शिवनाथ नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया केली असता, तो सपनाचा खून झालेला प्रियकर आशिष उपाध्यायचा असल्याचं समजलं. खुनाच्या गुन्ह्यात अटकेच्या भीतीनं त्यानं नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतं, असं पोलिसांनी सांगितलं.